गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे सोलापूर जनता बँकेस सन्मानपत्र

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे सोलापूर जनता बँकेस सन्मानपत्र

सोलापूर : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्ग बांधणीचा जागतिक विक्रम झालेल्या प्रकल्पात सहभाग घेतल्याबद्दल सोलापूर जनता सहकारी बँकेस गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे सन्मानपत्र देण्यात आले. या सन्मानपत्रामुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. या कंपनीतर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अमरावती आणि अकोला दरम्यान १०५ तास ३३ मिनिटे इतक्या वेळेत तब्बल ४२.५ किमीचा सिंगल लेनचा बिटूमिनस काँक्रिटचा रस्ता बांधण्यात आला. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये करण्यात आली.

या प्रकल्पासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेने राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. या कंपनीला भरीव अर्थसहाय्य केले. इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या सोलापूर जनता सहकारी बँकेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् ने दखल घेत हे सन्मानपत्र बहाल केले. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हा मान फक्त सोलापूर जनता सहकारी बँकेला मिळाला आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी हा सन्मान स्वीकारला.

सोलापूर जनता सहकारी बँकेने यापूर्वी ही अनेक मोठ्या प्रकल्पांकरिता अर्थसहाय्य केले आहे. यातून संबंधित उद्योग, व्यवसायाच्या वाढीस पर्यायाने मोठ्या प्रमाणावरील रोजगार निर्मितीस चालना मिळाली आहे. सोलापूर जनता सहकारी बँकेने केलेल्या अर्थसहायाच्या कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स नेही दखल घेतल्यामुळे खातेदार, कर्जदार, ग्राहकांनी सोलापूर जनता बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे आणि संपूर्ण संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
------------
कर्जदारांना सोलापूर जनता बँकेचे भक्कम पाठबळ

उद्योग, व्यवसाय, घरबांधणी अथवा अन्य कारणांसाठी कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना सोलापूर जनता सहकारी बँकेचे नेहमीच भक्कम पाठबळ राहिले आहे. आगामी काळातही उद्योजक, व्यावसायिकांच्या पाठीशी बँक खंबीरपणे उभी राहील.
----- मुकुंद कुलकर्णी,
मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जनता सहकारी बँक