'रेमडेसिव्हर' त्वरित मिळण्यासाठी आता शासनाची समिती

रुग्णांना दिलासा मिळण्याची आशा

'रेमडेसिव्हर' त्वरित मिळण्यासाठी आता शासनाची समिती

सोलापूर : प्रतिनिधी

रेमडेसिव्हर इंजेक्शन वेळेवर न मिळाल्यामुळे निर्माण होत असलेल्या समस्यांवर उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून का होईना रुग्णांना लवकरात लवकर रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध होईल अशी आशा आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून सोलापूरसह राज्यात रेमडेसिव्हर औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना हे औषध लिहून दिल्यानंतर नातेवाईक सोलापूरातील कोणत्याही मेडिकल दुकानात गेले तरी त्यांना हे औषध मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी नातेवाईकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत सर्वच स्तरांतून टीका होऊ लागल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी समिती स्थापन केली आहे. याबाबतचा आदेश शनिवारी दुपारी काढण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय हे कंट्रोल रूम म्हणून जाहीर करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे
समितीने करावयाची कामे :-
१) खासगी रुग्णालयात रेमडेसिव्हरचा उपयोग योग्य पद्धतीने होत आहेंकी नाही याची खातरजमा करावी.
२) रेमडेसिव्हरची गरज भासल्यास राज्यस्तरावरील अन्न व औषध प्रशासनाच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करावी.
३) समितीतील अधिकाऱ्यांनी रेमडेसिव्हरचा पुरवठा करणाऱ्या औषध कंपनीकडून होणारा पुरवठा व वाटप यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता तपासणी करून पुरवठादारांवर नियंत्रण ठेवावे. रेमडेसिव्हरचा तुटवडा जाणवणार नाही याची काळजी घ्यावी.
४) रेमडेसिव्हरचा पुरवठा स्टोकिस्टद्वारा कोव्हिड हॉस्पिटलला प्रथम करण्यात यावा, व त्याचे समन्वय करावे.
५) रेमडेसिव्हर मिळत नसल्याच्या प्रत्येक तक्रारीचे निराकरण करावे.

समितीत कोणाकोणाचा समावेश ?
१) अध्यक्ष - उपविभागीय अधिकारी हेमंत निकम
२) सदस्य - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले
३) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितालकुमार जाधव
४) डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहायक अधिष्ठाता डॉ.पुष्पा अग्रवाल
५) आयएमए चे डॉ. मिलिंद शहा
६) अन्न व औषध प्रशासनाचे (अन्न) सहायक आयुक्त प्रदीप राऊत
७) अन्न व औषध प्रशासनाचे (औषधे) सहायक आयुक्त नामदेव भालेराव

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्थापन केलेल्या या नव्या समितीमुळे रुग्णांना वेळेत रेमडेसिव्हरचा पुरवठा होतो की नाही यावर आगामी दोन ते तीन आठवड्यांनंतरची सोलापूरची कोरोनाची स्थिती अवलंबून असणार आहे.