संत श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

उळे येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले स्वागत

संत श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

‘गण गण गणात बोते’ आणि विठुनामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज शनिवारी सायंकाळी उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखी व वारकऱ्यांचे भक्तिभावात स्वागत केले. यावेळी प्रांत अधिकारी हेमंत निकम, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, उळे गावचे सरपंच अप्पा धनके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, मंडळ अधिकारी चंद्रकांत हेडगिरे, सुखदेव पाटील, जगदीश धनुरे यांच्यासह वारकरी उपस्थित होते.

श्री. शंभरकर यांनी गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखीचा आजचा मुक्काम उळे येथे असून उद्या सकाळी पालखी सोलापूर शहरात प्रवेश करणार आहे.
-------------
संत गजानन महाराज पालखी उद्या श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात

आषाढी एकादशीनिमित्त शेगाव होऊन पंढरपूरला निघालेली शेगाव संस्थानची संत गजानन महाराजांची पालखी उद्या (रविवारी) सम्राट चौक येथील प्रभाकर महाराज मंदिरात येणार आहे, अशी माहिती प्रभाकर महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख यांनी दिली.

संत गजानन महाराज पालखी सोलापूरात आल्यानंतर सकाळी ११ वाजता प्रभाकर महाराज मंदिरात येईल. या ठिकाणी प्रभाकर महाराज मंदिरातर्फे पालखीचे पूजन होणार आहे. श्री संत गजानन महाराजांचा आवडता पदार्थ असलेल्या पिठलं भाकरीचा नैवेद्य यावेळी दाखवला जाईल. यानंतर आरती होऊन भाविकांना दर्शन मिळणार आहे.

सोलापूरकरांनी यावेळी उपस्थित रहावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभाकर महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख यांनी केले आहे.