गणेशोत्सवात सोलापूरसाठी आयुक्तांनी जाहीर केले नियम
आदल्यादिवशी नियम प्रसिद्ध करत दाखवला सरकारी कामकाजाचा नमुना
सोलापूर : प्रतिनिधी
गणेशोत्सव साजरा करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय नियम असतील याची माहिती महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी गुरूवारी दुपारी जाहीर केली. गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपलेला असताना महापालिकेने आदल्यादिवशी नियम जाहीर करून सरकारी कामकाज आणि नागरिकांची गरज यांतील अंतर दाखविणारा कामकाजाचा नमुना दाखवून दिला आहे.
महापालिका आयुक्तांनी दिलेल्या नियमावलीत म्हटले आहे,
गणेशोत्सव मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
मर्यादीत स्वरूपाचे मंडप उभे करावेत. घरगुती किंवा सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
सार्वजनिक मंडळांची मूर्ती चार फूटांची तर घरगुती गणेशमूर्ती दोन फूटांची असावी.
यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातूच्या मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरीच करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास विसर्जन नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी करावे.
गर्दी टाळावी.
गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजीकल डिस्टन्सिंग) तसेच स्वच्छतेबाबतचे नियम (मास्क व सॅनिटायझर) पाळण्याकडे लक्ष द्यावे.
श्रीं च्या आगमन आणि विसर्जन मिरवणूका काढू नयेत. गणेश विसर्जनासाठी नागरिकांनी संबंधित विभागातील महापालिकेच्या गणेशमूर्ती संकलन केंद्राकडे सोपवाव्यात. यामूर्तींचे विसर्जन महापालिकेचे कर्मचारी करणार असल्याने या कामात स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य करावे.
प्रत्यक्ष सण सुरू झाल्यानंतर मधल्या काळात नव्याने काही सूचना शासन किंवा महापालिकेकडून प्रसिद्ध झाल्यास त्यांचे पालनही नागरिकांनी करावे.
–—–
प्रशासनाला आली उशीरा जाग
गणेशोत्सवाचा इतका मोठा सण दरवर्षी साजरा होत असताना याबाबतचे जे काही धोरण ठरले आहे याची माहिती किमान एक आठवडा नागरिकांना द्यावी असे महापालिका प्रशासनाला का वाटले नाही. १० तारखेपासून लागू होणारे नियम ९ तारखेला प्रसिद्ध करून महापालिकेने काय मिळविले असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.