अन् सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली !

प्रिसिजन संगीत महोत्सवात यंदा पं. रोणू मुजुमदार, पं. नयन घोष, मुग्धा वैशंपायन यांची हजेरी

अन् सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली !

सोलापूर : प्रतिनिधी

यंदाच्यावर्षी कोणत्या दिग्गज कलाकारांचे गायन आणि वादन ऐकायला मिळणार याची सोलापूरकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. आठव्या प्रिसिजन संगीत महोत्सवाची घोषणा प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

शनिवार २१ जानेवारी आणि रविवार २२ जानेवारी रोजी दररोज सायंकाळी ठिक ६.२५ वाजता प्रिसिजन संगीत महोत्सव हुतात्मा स्मृती मंदिरात होणार आहे.

शनिवार दिनांक २१ जानेवारी रोजी सा रे ग म लिटिल चॅम्प फेम मुग्धा वैशंपायन यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर अभिजित बारटक्के तर संवादिनीवर मिलिंद कुलकर्णी हे साथ करतील.

त्याचदिवशी शनिवारी दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक पंडित नयन घोष यांचे सतारवादन होणार आहे. त्यांना चिरंजीव ईशान घोष तबल्यावर साथ करतील.

रविवार, दिनांक २२ जानेवारी रोजी पं. अजय चक्रवर्ती यांचे शिष्य आणि शास्त्रीय - उपशास्त्रीय गायक पंडित अमोल निसळ यांचे गायन होईल. त्यांना राहूल गोळे व प्रशांत पांडव हे अनुक्रमे संवादिनी व तबल्यावर साथ देतील. तर दुसऱ्या सत्रात प्रख्यात बासरीवादक पं. रोणु मजुमदार यांचे बासरीवादन होईल. त्यांना तबला साथ पंडित अरविंदकुमार आझाद देणार आहेत, असे डॉ. शहा यांनी सांगितले.

पुण्यातील ’सवाई गंधर्वच्या धर्तीवर सोलापूरातही पूर्णपणे शास्त्रीय संगीताला समर्पित महोत्सव व्हावा, या उद्देशाने प्रिसिजन फाउंडेशन मागील ७ वर्षांपासून प्रयत्नशील आहे.

समस्त सोलापूरकर रसिकांनी याचा लाभ घ्यावा. यासाठी मोफत प्रवेशिका उद्या मंगळवार दि. १७ जानेवारीपासून सकाळी ९ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत हुतात्मा स्मृति मंदिर येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

रसिकांनी आपल्या निःशुल्क प्रवेशिका आपले नाव नोंदवून त्वरीत घ्याव्यात. त्यावर आसन क्रमांक नसेल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर बसण्याची सोय आहे.

कार्यक्रम वेळेवरच सुरू होणार असल्याने रसिकांनी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी स्थानापन्न व्हावे, असे आवाहनही प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, संदिप पिस्के उपस्थित होते.
------

कलाकारांची थोडक्यात ओळख 'महाबातमी' च्या वाचकांसाठी

मुग्धा वैशंपायन:- मुग्धा वैशंपायन सारेगमपा लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील आघाडीची गायिका होती. २००९ पासून मुग्धा अनेक स्टेज शो आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसते आणि तिची कारकीर्द सध्या म्युझिक अल्बम, चित्रपट आणि टीव्ही मालिकांसाठी प्लेबॅक, मीडिया जाहिराती, रिअँलिटी शो अँकरिंग,आणि तिच्या एकल गायनाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून दिसत आहे. एप्रिल २०१० मध्ये, नंदू घाणेकर यांनी तिला ताऱ्यांचे बेट नावाच्या पहिल्या मराठी चित्रपटात गाण्याची संधी दिली. मुग्धाचे सध्या अनेक मालिका व चित्रपटात पार्श्वगायन करते तसेच तिचे शास्त्रीय संगीताचे एकल कार्यक्रम सादर होतात.

पंडीत नयन घोष :-  हे प्रख्यात तबला आणि सतार वादक आहेत. ते फरुखाबाद घराण्याचे तबलावादक आहेत. त्यांना गायन, तबला आणि सतार वादनाचे शिक्षण त्यांचे वडील पद्मभूषण पंडित निखील घोष ह्यांच्याकडून मिळाले आणि त्यानंतर पंडित बुद्धदेव दासगुप्ता ह्यांच्याकडे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी उस्ताद अहमद जान थिरकवाँ आणि पंडित ज्ञानप्रकाश घोष ह्यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. त्यांचा पहिला स्वतंत्र तबला वादनाचा कार्यक्रम १९६० मध्ये, त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी झाला. त्यांनी हेलसिंकी, ब्रात्सिल्वा, रोम, बार्सेलोना, मुर्शीया, अथेन्स, ह्यासारख्या अंतरराष्ट्रीय म्युझिक फेस्टिव्हलमध्ये त्यांनी सतारवादन केले आहे. त्यांनी पंडित रवी शंकर, उस्ताद विलायत खाँ, पंडित निखील बॅनर्जी, पंडित जसराज, पंडित शिवकुमार शर्मा,आणि अशा अनेक लोकांना तबला वादनाची साथ केली आहे. घोष यांना १९८५ साली सूर सिंगार संसद, मुंबईचा ताल मणी आणि सूरमणी पुरस्कार मिळाला आहे. कॅलिफोर्नियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरने त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल पुरस्कार दिला आणि २०१३ साली स्वर साधना समिती, मुंबईचा स्वर साधना रत्न पुरस्कार त्यांना मिळाला. भारत सरकारचा २०१४ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार ही त्यांना मिळाला.

अमोल निसळ:- हे पंडित अजय चक्रवर्ती,कोलकाता यांचे शिष्य आहेत. अमोल निसळ हे गुरू पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे, पुणे यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली शिकले. रोटरी इंटरनॅशनलच्या शिष्यवृत्तीद्वारे लॅटिन अमेरिकन देशांमध्ये भारताचे सांस्कृतिक राजदूत म्हणून काम केले. त्या देशांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची अनुभूती देण्यासाठी विविध ठिकाणी सादरीकरण केले. स्टेट बँक ऑफ इंडियाने सलग ३ वर्षे घेतलेल्या देशव्यापी शास्त्रीय संगीत स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने टिळक स्मारक मंदिर,पुणे येथे आयोजित कार्यक्रमात अनुप जलोटा. यांच्या उपस्थितीत शास्त्रीय आणि उप  शास्त्रीय संगीत सादरीकरण केले. 
अमोल निसळ यांना ‘भजनसम्राट’ श्री अनुप जलोटा यांच्या हस्ते ‘गंधर्व पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे. तसेच त्यांना सेंटर फॉर कल्चरल रिसोर्स अँड ट्रेनिंगद्वारे हिंदुस्थानी गायन संगीत क्षेत्रातील ‘सांस्कृतिक प्रतिभा शोध शिष्यवृत्ती योजने’ अंतर्गत पुरस्कार प्राप्त झाला आहे.

पं रोणू मजुमदार:- पं मजुमदार हे बासरी वाद्याच्या लोकप्रिय संगीतकारां पैकी एक आहेत. विशेषतः पं मजुमदार यांचे संगीत मैहर घराण्यात रुजले आहे ज्यात पं रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खान यांच्यासारखे नामवंत संगीतकार आहेत..पं मजुमदार हे इतर आघाडीच्या वादकांसोबत जुगलबंदीसाठी देखील ओळखले जातात. ते एक नाविन्यपूर्ण संगीतकार आहेत ज्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या इतर
प्रकारांसह विशेषत:पाश्चात्य शास्त्रीय संगीत, कॅरीइंग होप, ट्रॅव्हलर्स टेल, सॉन्ग ऑफ नेचर या प्रकल्पांसह अनेक नवीन कंपोजिशन तयार केले विविध संगीत महोत्सवांमध्ये संपूर्ण भारतातील त्यांच्या मैफिलीं व्यतिरिक्त, त्यांनी मॉस्कोमधील भारत महोत्सव आणि नवी दिल्लीतील "एशियाड ८२"  मध्ये देखील भाग घेतला. त्यांनी युरोप, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, जपान, सिंगापूर, थायलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि मध्य पूर्व या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर दौरे केले आहेत.
१९८१ मध्ये रोणू मजुमदार यांनी ऑल इंडिया रेडिओ स्पर्धेत प्रथम पारितोषिक आणि राष्ट्रपती सुवर्णपदक जिंकले. पॅसेजेस आणि चँट्स ऑफ इंडिया सारख्या अल्बममध्ये त्यांनी पंडित रविशंकर यांच्यासोबत त्यांनी काम केले. १९९९ मध्ये त्यांच्या संगीतातील समर्पणाबद्दल प्रतिष्ठित आदित्य विक्रम बिर्ला पुरस्कार देण्यात आता. सहारा इंडिया परिवाराने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले. २०१४ मध्ये त्यांनी प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार जिंकला.