भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या बैठकीमध्ये लागले 'मोदी मोदी' चे नारे

२० हजार सभासदांची उपस्थिती

भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या बैठकीमध्ये लागले 'मोदी मोदी' चे नारे

सोलापूर : प्रतिनिधी

भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या बैठकीमध्ये 'मोदी मोदी' चे नारे लागले. निमित्त होते भटक्या विमुक्त जाती जमाती संचलित नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बैठकीचे.

शनिवारी सायंकाळी सेटलमेंट परिसरात सुमारे २० हजार सभासदांच्या उपस्थितीत ही भव्य बैठक पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव, नागनाथ गायकवाड, वसंत जाधव, पवन गायकवाड, राम गायकवाड, सोमनाथ जाधव, अरुणा वर्मा, शिवा गायकवाड, काशिनाथ गायकवाड, अमोल गायकवाड आदी उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव म्हणाले, भटक्या विमुक्तांच्या पाठिंब्यावर ज्यांनी  ७० वर्षे राज्य केले त्यांनी कोणतीही मदत केली नाही. भटक्या विमुक्त जाती जमातींना आजही निवारा मिळालेला नाही. ते कायम भटकेच राहिले. भटक्या विमुक्त जाती जमातीमधील नागरिकांना निवारा मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आपल्याला संघटित होण्याशिवाय पर्याय नाही. ही जागा भटक्या विमुक्त समाजाचीच आहे. त्यामुळे भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. माजी आमदार नरसय्या आडम यांना कामगारांसाठीची घरे बांधण्यासाठी कोणी मदत केली ? असे भारत जाधव यांनी विचारताच नागरिकांनी 'मोदी मोदी' चे नारे लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी कोट्यावधींच्या संख्येने घरे बांधून दिली आहेत. भटक्या विमुक्त समाजासाठी घरांची निर्मिती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम आहे अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी नोंदवली. 

वसंत जाधव यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा गव्हाणे यांनी सूत्रसंचालन तर पवन गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.