अरे वा ! कोणत्याही दोषाशिवाय केला तब्बल २ लाख कॅमशाफ्टचा पुरवठा
सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा : कोणत्या कंपनीची कामगिरी ? वाचा !
सोलापूर : प्रतिनिधी
कोणत्याही दोषाशिवाय टोयोटा मोटर्स कंपनीला तब्बल २ लाख कॅमशाफ्टचा पुरवठा करण्याची उत्तम कामगिरी सोलापूरच्या प्रिसिजन कॅमशॉफ्ट लिमिटेड या कंपनीने केली. २०२२ मधील व्यवसायिक कामगिरीसाठी टोयोटा मोटर्स कंपनीकडून 'झिरो डिफेक्ट सप्लाईज' व 'बेस्ट क्वालिटी सप्लायर ऑफ द ईयर' हे दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पहिला पुरस्कार "झिरो डिफेक्ट सप्लाईज" चा आहे. म्हणजेच २०२२ च्या संपूर्ण वर्षात प्रिसिजनने टोयोटा मोटर्सला पुरवलेल्या कॅमशाफ्टमध्ये कोणतेही दोष नव्हते.
हा पुरस्कार मिळणे हे उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये प्रिसिजनचे सातत्य दर्शवते. मागील वर्षात प्रिसिजनने टोयोटा मोटर्स कंपनीला कोणत्याही दोषाशिवाय २ लाख कॅमशाफ्टचा पुरवठा केला आहे.
टोयोटा मोटर्स कंपनीने प्रिसिजनला दिलेला दुसरा पुरस्कार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि एकमेव आहे. “बेस्ट क्वॉलिटी सप्लायर” असे या पुरस्काराचे नाव आहे. हा पुरस्कार पुरवठ्यातील सातत्यपूर्ण गुणवत्ता, स्पर्धात्मक किंमत, शून्य अपघात, पुरवठ्यातील शून्य चुका आणि ऑडिटमध्ये एकही चुकीचे निरिक्षण नसणे या सर्व निकषांवर दिला जातो. असा पुरस्कार मिळवणारी प्रिसिजन कॅमशाफ्ट्स ही एकमेव पुरवठादार कंपनी ठरली आहे.
प्रिसिजनने मागील ३० वर्षांपासून सर्वोत्कृष्ट गुणवत्ता, कस्टमर फोकस कामातील अचूकपणा हीच आपली ओळख बनविली आहे. पॅसेंजर कारच्या कॅमशाफ्ट उत्पादनातील अग्रगण्य उत्पादन कंपनी म्हणून प्रिसिजनची जगात ओळख निर्माण झाली आहे. टोयोटा मोटर्ससारख्या जगविख्यात उद्योग समुहाकडून हा पुरस्कार मिळणे हा फक्त प्रिसिजनचा नाही तर सोलापूरमधील कामगारांचा बहुमान आहे. बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रिसिजन कंपनीच्यावतीने कंपनीचे क्वालिटी हेड गणेश चिंताकिंदी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या दोन पुरस्कारांबद्दल प्रिसिजन कॅमशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांनी सर्व कर्मचारी, अधिकारी यांचे अभिनंदन केले.