मानवी जीवनाचा शोध घेण्यासाठी पुरातत्त्वशास्त्र उपयुक्त

डॉ. गो.बं. देगलूकर : विद्यापीठातील पुरातत्वीय वस्तू संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन

मानवी जीवनाचा शोध घेण्यासाठी पुरातत्त्वशास्त्र उपयुक्त

सोलापूर : प्रतिनिधी

पुरातत्त्वशास्त्र हे सनातन आहे मानवी जीवनाचा शोध घेण्यासाठी हे शास्त्र उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलांतर्गत प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागातर्फे पुरातत्व दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. यावेळी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा.डॉ. गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील, डॉ. प्रभाकर कोळेकर, किशोर चांडक, डॉ. बालाजी गाजूल व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते विद्यापीठातील पुरातत्वीय वस्तुसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचे उदघाटन झाले. कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते नाणी संग्राहक किशोर चांडक यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. बालाजी गाजूल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

डॉ. गो. बं. देगलूरकर पुढे म्हणाले की, पुरातत्व हा खूप जुना विषय आहे. या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यास मागासलेले, सनातनी किंवा प्रतिगामी असे म्हटले जात नाही. ज्यांच्या स्मरणार्थ पुरातत्व दिन साजरा केला जातो ते थोर पुरातत्व शास्त्रज्ञ सांकलीया सर यांचे या क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी डेक्कन कॉलेजचे शिक्षक होते. त्यांनी पुरातत्व शास्त्रात मोठे काम केले. तिथेच घडलेल्या डॉ. माया पाटील यांनी सोलापुरात हे संग्रहालय उभा करून परंपरा सुरू ठेवली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, विद्यापीठात इतरांपेक्षा वेगळे काही करावे ही भावना ठेवून आम्ही सतत काही करत आलो आहोत. पुरातत्वीय वस्तुसंग्रहालय हा त्याचाच एक भाग आहे. विद्यापीठावर विश्वास ठेवून अनेक दानशूर व्यक्तींनी या पुरातत्वीय वस्तुसंग्रहालयास दुर्मिळ नाणी, प्राचीन मुर्त्या दान केल्या आहेत. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. वस्तुसंग्रहालयाचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल. आपल्या संस्कृतीला जाणून घेण्यासाठी पुरातत्व शास्त्र हा विषय खूप महत्वाचा आहे. याच्या अभ्यासातून आपल्या संस्कृतीला पुन्हा उजाळा मिळेल. आगामी काळात विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभे केले जात आहे. तेथेही आम्ही अहिल्यादेवींच्या जलसंधारण कामाची आठवण येईल अशी प्रतिकृती उभी करत आहोत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माया पाटील यांनी केले. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. ज्ञानेश्वरी हजारे यांनी मानले.

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट संग्रहालय
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कमी कालावधीत खूप मोठी झेप घेतली आहे. या विद्यापीठात उभारलेले पुरातत्वीय संग्रहालय हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट संग्रहालय आहे. या जिल्ह्यातील अभ्यासकांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. पुरातत्वीय संग्रहालयामुळे संशोधनाला गती येईल, असेही डॉ. देगलूरकर म्हणाले.

विद्यापीठाला अहिल्यादेवींची दोन नाणी भेट
सोलापुरातील नाणी संग्राहक किशोर चांडक यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील दुर्मिळ नाणी विद्यापीठास भेट दिली. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे श्री. चांडक यांनी ही नाणी सुपूर्त केली. याबद्दल कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.

जुन्नर येथे वस्तू संग्रहालय
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे जुन्नर येथे रुसाच्या निधीतून पुरातत्वीय वस्तुसंग्रहालय उभे करण्यात येत आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या वस्तुसंग्रहालयामुळे अभ्यासाला गती येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.