सोलापूर भाजपमध्ये भूकंप !
पाच नगरसेवकांसह व्यापारी आघाडीच्या शहराध्यक्षांनी दिला राजीनामा
सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप होऊन दोन दिवसही उलटलेले नसताना सोलापूर शहरातही राजकीय भूकंप झाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या तब्बल पाच नगरसेवक आणि व्यापारी आघाडीच्या शहराध्यक्षांनी गुरुवारी सायंकाळी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे दिला आहे.
भारतीय जनता पार्टीचे सोलापूर महानगरपालिकेतील माजी सभागृहनेते सुरेश पाटील, नगरसेवक नागेश वल्याळ, नगरसेवक संतोष भोसले, नगरसेविका राजश्री चव्हाण, नगरसेविका जुगनबाई आंबेवाले तसेच व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष जयंत होले - पाटील यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा आणि पदांचा राजीनामा भाजप कार्यालयात सादर केला. या घटनेमुळे सोलापूर भाजपमध्ये आणि सोलापूर शहराच्या एकूणच राजकारणात उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.
माजी सभागृहनेते सुरेश पाटील आणि सोलापूरचे माजी खासदार स्व. लिंगराज वल्याळ यांचे चिरंजीव असलेले नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या राजीनाम्यामुळे भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्यानंतर ५ भाजप नगरसेवकांनी दिलेले राजीनामे शहराच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे ठरले आहेत.
-------------
नागेश वल्याळ उद्या घेणार बैठक
भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ उद्या शुक्रवारी सकाळी नऊ वाजता आपल्या निवासस्थानी तेलगू समाजातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून त्यानंतर आगामी दिशा स्पष्ट करणार असल्याचे श्री. वल्याळ यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' ला सांगितले.
--------
याबाबत माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.