मुंबईत अजितदादांची तर सोलापुरात वरूणराजाची जोरदार बॅटिंग
शहरातील रस्त्यांना आले ओढ्याचे स्वरूप
सोलापूर : प्रतिनिधी
तिकडे मुंबईत बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्फोटक राजकीय विधानांची ढगफुटी झालेली असताना तर इकडे सोलापुरात वरूणराजाने जोरदार बॅटिंग करत हजेरी लावली. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक मोठा पाऊस बुधवारी सोलापूर शहर आणि परिसरात झाला.
बुधवारी सायंकाळी प्रारंभी पडणाऱ्या हलक्या सरींचे रूपांतर काही वेळातच मोठ्या पावसात झाले. अवघ्या अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर संपूर्ण सोलापुरात पुन्हा मोठ्या पावसास सुरुवात झाली. त्यामुळे पाऊस थांबल्याचे पाहून कामासाठी बाहेर पडलेल्या सोलापूरकरांची एकच धांदल उडाली. विजेच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. अनेक रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचे स्वरूप आले होते.
काही भागात पावसाने विश्रांती घेताच सोलापूरकर चहा टपरी आणि भजीच्या गाड्यांवर जाऊन खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेताना दिसले.