श्री शिवछत्रपतींवर सोलापूरात झाले इंग्रजीतून व्याख्यान

प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांचा सोलापूरकरांशी संवाद

श्री शिवछत्रपतींवर सोलापूरात झाले इंग्रजीतून व्याख्यान

सोलापूर : प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर रविवारी इंग्रजीतून व्याख्यान झाले. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी 'मॅनेजमेंट लेसन्स फ्रॉम छत्रपती श्री शिवाजी महाराज' या विषयावर सोलापूरकरांना इंग्रजीतून मार्गदर्शन केले.

स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे रामायण आणि महाभारतातील सर्व चांगल्या गुणांचा समुच्चय छत्रपती श्री शिवरायांच्या ठायी होता. श्री शिवचरित्र हे व्यवस्थापन शास्त्राचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे माजी प्रांतपाल माजी प्राचार्य के. भोगीशयना स्मृती व्याख्यान रविवारी सकाळी शिवस्मारक सभागृहात झाले. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी, सचिव ब्रिजकुमार गोयदानी उपस्थित होते.

माजी प्राचार्य के. भोगीशयना यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी म्हणाले, आधुनिक काळात व्यवस्थापन शास्त्र लिहिणाऱ्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याकडे दुर्लक्ष केले हे त्यांचे दुर्दैव आहे. श्री शिवछत्रपतींची आज्ञापत्र या ग्रंथातून त्यांच्या व्यवस्थापनाची चुणूक दिसून येते. ध्येय निश्चित करणे ही व्यवस्थापनाची पहिली पायरी आहे. त्यानुसार श्री शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापनेचे ध्येय वयाच्या १५ व्या वर्षी निश्चित केले आणि आपल्या अंगभूत व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर ते पूर्ण देखील केले. ध्येयपूर्तीसाठी आवश्यक असलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, वेळेचे नियोजन, सहकाऱ्यांना मूल्यांची प्रेरणा देणे, आपल्या ध्येयाविषयीची एकनिष्ठता हे घटक श्री शिवछत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेच्या ध्येयपूर्तीचे मैलाचे दगड ठरले, असेही प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी सांगितले.

रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष किशोर चंडक यांनी माजी प्राचार्य के. भोगीशयना यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. संदीप जव्हेरी यांनी परिचय करुन दिला. गोवर्धन चाटला यांनी सूत्रसंचालन तर सचिव ब्रिजकुमार गोयदानी यांनी आभार प्रदर्शन केले.