कौतुकास्पद ! सोलापूरच्या हर्षल आकुडे यांची केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयात आयआयएसपदी निवड
सर्वस्तरांतून होतेय अभिनंदन
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरचे सुपुत्र पत्रकार हर्षल आकुडे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयात (एमआयबी) निवड करण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातील भारतीय माहिती सेवेत (आयआयएस) सिनिअर ग्रेड गॅझेटेड ऑफिसर पदाकरिता मराठी भाषेसाठी हर्षल आकुडे यांची निवड करण्यात आली.
या पदासाठीच्या मुलाखती मार्च महिन्यात दिल्ली येथील यूपीएससी भवन येथे घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
हर्षल आकुडे हे सध्या नवी दिल्ली येथे पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. हर्षल आकुडे यांचे पत्रकारितेचे शिक्षण सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभाग तसेच पुणे विद्यापीठात झालेले आहे. तर, त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण डीबीएफ दयानंद महाविद्यालय येथे आणि शालेय शिक्षण विद्यानिकेतन प्रशाला, सोलापूर येथून पूर्ण झाले.
हर्षल आकुडे यांना सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरु डॉ.गौतम कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हर्षल आकुडे यांना त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाचे विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर, सहायक डॉ. अंबादास भासके, डॉ.तेजस्विनी कांबळे यांच्यासह सोलापूर 'सकाळ' चे निवासी संपादक अभय दिवाणजी यांचे मार्गदर्शन लाभले.
अतिशय बिकट परिस्थितीवर मात करत हर्षल आकुडे यांनी मिळवलेल्या या यशाचे सोलापुरात सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.