केंद्र सरकारच्या माध्यम शब्दकोश निर्मिती समितीवर डॉ. रविंद्र चिंचोलकर
सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद
सोलापूर : प्रतिनिधी
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे त्रैभाषिक माध्यम शब्दकोश निर्मिती करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. या कार्यासाठी निवडलेल्या समितीवर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांची निवड करण्यात आली आहे.
यासंदर्भात डॉ. चिंचोलकर यांना भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे पत्र प्राप्त झाले आहे. इंग्रजी, हिंदी व मराठी या तीन भाषांमध्ये माध्यम शब्दकोश तयार करण्याचे कार्य भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने हाती घेतलेले आहे. हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी या समितीची बैठक दिनांक ५ ते ९ सप्टेंबर २०२२ दरम्यान महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मान्यवर भाषा तज्ञांचा सहभाग असणार आहे.
या निवडीमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्याची देशस्तरावर नोंद घेतली जात असल्याचे मत डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी व्यक्त केले. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्रभारी प्र कुलगुरू डॉ. विकास पाटील, प्र कुलसचिव डॉ. सुरेश पवार, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ गौतम कांबळे यांच्यासह अधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांनी डॉ. चिंचोलकर यांचे अभिनंदन केले आहे.