पीएच. डी मौखिक परीक्षा पुन्हा ढकलल्या पुढे

विद्यापीठाने दिले 'हे' कारण

पीएच. डी मौखिक परीक्षा पुन्हा ढकलल्या पुढे

सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पीएच.डी प्रवेश (पेट-8) मौखिक परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यासाठी एस. टी. कर्मचार्‍यांचा संप आणि हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजाचे कारण देण्यात आले आहे.

त्यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पेट-8- पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या विविध 36 विषयांच्या मौखिक परीक्षेचे आयोजन सुरुवातीला 16 ते 22 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये विद्यापीठात ऑफलाइन पद्धतीने करण्यात आले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या परीक्षा पुढे ढकलून दि. 23 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मौखिक परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासंदर्भाची संपूर्ण तयारी संशोधन विभागाच्यावतीने करण्यात आली होती. यात एकूण 1 हजार 300 उमेदवारांच्या मुलाखती होणार होत्या. संपूर्ण महाराष्ट्रातून परीक्षार्थी यासाठी हजर राहणार होते. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप न मिटल्याने विविध जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था सुरळीत नाही. तसेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक ठिकाणी पावसासंदर्भात हाय अलर्ट सांगितलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता उपस्थित राहण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन पीएच. डी प्रवेशाची मौखिक परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी दिली.

आता सुधारित वेळापत्रकानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश मौखिक परीक्षा दि. 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आल्या आहेत.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित परीक्षार्थींनी मौखिक परीक्षेस हजर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
-------
ऑनलाईन घेण्यास अडचण काय
मौखिक परीक्षा होण्याची वाट पाहत परीक्षार्थी अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने का घेण्यात येत नाहीत, असे विचारले असता ऑनलाईन परिक्षा घेण्यात अनेक अडचणी आहेत. जिल्ह्याच्या बाहेरचे सुमारे 600 विद्यार्थी आहेत. एस. टी. चा संप कायम राहिला तर परीक्षार्थीचे नुकसान होईल म्हणून परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे प्र. कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी सांगितले. मात्र अनेक कामे ऑनलाईन होत असताना मौखिक परीक्षाच ऑनलाईन होण्यात अडचण काय हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.

----------

ऑनलाईन व ऑफलाईन व्हाव्यात परिक्षा

आपल विद्यापीठ हे डिजिटल विद्यापीठ म्हणून सर्वश्रुतच आहे. सर्व व मोठ्यात मोठी परीक्षा पीएचडीची अंतीम मौखिक परीक्षादेखील ऑनलाइन घेतल्यास चालू शकते. तर या सध्या एसटी संप व इतर कारणामुळे जर विद्यार्थी विद्यापीठापर्यंत पोहचू शकत नसला तर ऑनलाईन व ऑफलाईन अशा पद्धतीने परीक्षा व्हायला पाहिजे व तश्या पध्दतीने घेतल्या तर सर्व विद्यार्थ्यांची नक्कीच सोय होईल.
--डॉ. नरेंद्र काटीकर