विद्यापीठाच्या 'या' चुकीमुळे ४०० विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या टांगणीला

तीन ते १० लाखांपर्यंतच्या पॅकेजच्या नोकऱ्या गेल्या तर याला जबाबदार कोण ?

विद्यापीठाच्या 'या' चुकीमुळे ४०० विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या टांगणीला

सोलापूर ः प्रतिनिधी

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने वेळेत गुणपत्रिका न दिल्याने सुमारे 400 विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या टांगणीला लागल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाल्यानंतर 65 दिवसांनंतरही गुणपत्रिका विद्यापीठाने न दिल्याने कंपन्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीवर रूजू करून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे मिळालेली नोकरीची ही संधी गेली तर याला जबाबदार कोण असा प्रश्‍न विद्यार्थ्यांमधून विचारला जात आहे.

विद्यापीठाकडून अभियांत्रिकीच्या प्रथम, व्दितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या परिक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, टेलिकम्युनिकेशन आदी अभ्यासक्रमांच्या या परिक्षा झाल्या आहेत. नियमानुसार 45 दिवसांच्या आत विद्यापीठाने परिक्षांचा निकाल लावणे आवश्‍यक आहे. त्यानुसार विद्यापीठाने निकाल तर जाहीर केला. परंतु गुणपत्रिका देण्यास प्रचंड विलंब होत आहे. यंदाच्यावर्षी सुमारे 3 हजार 500 विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीची परिक्षा दिली. यातून 500 विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमधून इन्फोसिस, टीसीएस, टाटा टेक्नॉलॉजी, बायजू, कॉग्नीजंट, महिंद्रा, ॲटलास कॉपको अशा अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. वार्षिक तीन लाख ते 10 लाख रूपयांपर्यंत पॅकेज असलेल्या या नोकऱ्या मिळहूनही विद्यापीठाने अद्याप गुणपत्रिका न दिल्यामुळे यातील अनेक विद्यार्थ्यांना कंपन्या गुणपत्रिकेशिवाय नोकरीवर रूजू करून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे या सुमारे 400 विद्यार्थ्यांवर नवे संकट ओढवले आहे. विद्यापीठाच्या या विचित्र कारभारामुळे जर उद्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली तर याला जबाबदार कोण असा प्रश्‍न विद्यार्थ्यांमधून विचारला जात आहे.
----------------------

याला जबाबदार कोण ?

सध्या करोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत अभियांत्रिकीची पदवी मिळवत असतानाच नोकरी मिळाल्याचे भाग्य लाभलेल्या विद्यार्थ्यांना निकाल व गुणपत्रिकेसाठी महिनोंमहिने वाट पहाणे वेदनादायक व दुर्दैवी आहे. अद्ययावत तंत्रप्रणाली उपलब्ध असूनही ऑनलाईन पध्दतीने घेतलेल्या परीक्षेचा निकाल व मार्कलिस्टसाठी लागणाऱ्या अधिकच्या अवधीचे गमक लक्षात येत नाही. या प्रकारामुळे नोकरी गेल्यास किंवा रुजू करण्यात अडचणी उद्भवल्यास जबाबदारी कोण स्वीकारणार ? यामुळे विद्यापीठ व त्यांचे सर्व घटक यांची प्रतिमा प्रश्नांकित होऊ शकते.

--- प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर

------------------------

विद्यापीठ प्रयत्नशील

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका देण्यासाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रयत्नशील आहे. पुढील चार ते पाच दिवसांत गुणपत्रिका देण्याचा प्रयत्न आहे. कोविडमुळे मनुष्यबळ कमी असल्याने या समस्या येत आहेत.

–डॉ. शिवकुमार गणपूर, परिक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ