परीक्षा सुरळीत होण्यासाठी हवी उपाययोजना

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची सूचना

परीक्षा सुरळीत होण्यासाठी हवी उपाययोजना

सोलापूर, दि.9 : विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा. एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासंदर्भात विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज केल्या.

          श्री.सामंत यांनी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट देऊन वॉर रूमची पाहणी केली, त्यानंतर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रारंभी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालिका डॉ. राजश्री देशपांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या अंतिम वर्ष, एटी-केटी, बॅकलॉगच्या ऑनलाइन-ऑफलाईन परीक्षेसंदर्भात कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी मंत्री सामंत यांना माहिती दिली. यावेळी त्यांनी शुक्रवारी घेतलेल्या ऑनलाईन व ऑफलाईनच्या सर्व परीक्षा सुरळीत पार पडल्याचेही सांगितले. त्यावेळी मंत्री सामंत यांनी सर्व अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश विद्यापीठ प्रशासनास दिले. विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा व्हायरसच्या अटॅ्कमुळे पुढे ढकलाव्या लागल्या. याबाबत काही शंका असल्यास सायबर सेलकडे तक्रार नोंदवावी, अशा सूचनाही श्री.सामंत यांनी दिल्या.