बासरीच्या स्वर्गीय सूरात अन् पल्लेदार तानात रसिक चिंब

प्रिसिजन संगीत महोत्सवाची सांगता : सोलापूरकर रसिकांनी केली वाहवा

बासरीच्या स्वर्गीय सूरात अन् पल्लेदार तानात रसिक चिंब

सोलापूर : प्रतिनिधी

भगवान श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची चाहूल देणारे बासरीचे स्वर्गीय, अमीट सूर आणि दिमतीला शास्त्रीय गायनातील पल्लेदार ताना, हरकती यांच्या स्वर वर्षावात सोलापूर रसिक हरखून गेले. लयबद्ध तबला वादनाने कळस संगीतरुपी मंदिरावर कळस चढविला. प्रिसिजन फाऊंडेशन आयोजित आठव्या प्रिसिजन संगीत महोत्सवाची सांगता रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात झाली.

प्रिसिजन संगीत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी पंडित अमोल निसळ यांचे स्वागत प्रिसिजनचे चेअरमन यतिन शहा यांनी केले. तबला वादक प्रशांत पांडव यांचे स्वागत प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले. हार्मोनिअम वादक राहुल गोळे यांचे स्वागत प्रिसिजनचे संचालक रवींद्र जोशी यांनी केले. तसेच त्यांचे सहकारी शार्दुल काणे यांचे स्वागत प्रिसिजनचे कार्यकारी संचालक करण शहा यांनी तर करण देवगावकर यांचे स्वागत प्रिसिजन फाऊंडेशनच्या संचालिका मयुरा शहा यांनी केले. माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

राग भूपालीने पंडित अमोल निसळ यांनी सादरीकरणाची सुरुवात केली. विलंबित एकतालातील 'मोहे सब सुख दीन प्रभूरंग बिन..'ही बंदिश सादर केली. सरगम व तानांचा तसेच तिहाईचा वापर अशा वैशिट्यांनी  त्यांनी भूप सजविला. त्यानंतर त्यांनी गंधर्वीय ठेक्यात गुंफून 'देव महादेव' व त्रितालातील 'तोरे नैनोने मोसे ऐसी किनी' व द्रुत तीनतालातील 'दीम तदानी दिर तदानी दिर ता तानोम' हा तराना व 'चदरिया झिनी नी रे दिनी' हा संत कबिरांचा दोहा सादर केला. त्यांना संवादिनीवर राहूल गोळे, तबल्यावर प्रशांत पांडव तर तालवाद्याची साथ नागेश भोसेकर यांनी केली. रसिकांच्या त्यांनी आग्रहावरून त्यांनी 'ज्ञानियांचा राजा गुरूमहाराव' हा अभंग सादर केला.

महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात प्रख्यात बासरीवादक पंडित रोणू  मुजुमदार यांचे बासरी वादन झाले. त्यांना तबला साथ पंडीत अरविंदकुमार आझाद यांनी तर बासरीची साथ कल्पेश साचला यांनी 
केली. पंडित रोणू  मुजुमदार यांनी जयजयवंती रागाने प्रारंभ केला. आलाप, जोड, झाला सादर करत त्यांनी रसिकांच्या टाळ्या मिळवल्या. रूपक तसेच त्रितालात त्यांनी बासरीवादन केले. रूपकमधील 'मोरे मंदिर वो नहीं आये' या भजनाला रसिकांनी दाद दिली. अरविंदकुमार आझाद यांचे तबलावादन रसिकांना विलक्षण भावले.

जयजयवंतीच्या दोन्ही  प्रकारातील गंधारांचा आणि मिंडप्रधानेचा अत्युच्च आविष्कार त्यांच्या वादनातून रसिकांनी अनुभवला. मंद्रात आलापी करताना त्यांनी लावलेला मंद्र षड़ज व राग बढत करत लावलेला तारषड़ज व अतितारषड़ज रसिकांसाठी स्तिमित व रोमांचित करणारा होता. गमकढंग, सहजता व स्पष्टता, सौंदर्यपूर्णता जपत त्यांनी आलाप, जोड व झाला सादर करून त्यांनी मध्यलय रूपक तालात गत सादर केली. त्यानंतर त्यांनी त्रितालातील 'मोरे मंदिर अजहूँ न आये' ही बंदिश गाईली व वाजवली.

त्यांना पं. अरविंदकुमार आझाद यांनी बनारस घराण्याची बलस्थाने, दायाँ-बाँया यांचे संतूलन गणीतीय व सौंदर्यपूर्णता यांचा मिलाफ साधणारी साथसंगत यामुळे बासरीवादनाची रंगत वाढत गेली़. 
माझे माहेर पंढरी या अभंगाने
त्यांनी सांगता केली.