सतारीचे स्वर अन् बंदिशीच्या सुरांनी सोलापूरकर 'मुग्ध'

प्रिसिजन संगीत महोत्सवाची सुरेल सुरवात : दर्दी श्रोत्यांची तुडुंब गर्दी

सतारीचे स्वर अन् बंदिशीच्या सुरांनी सोलापूरकर 'मुग्ध'

सोलापूर : प्रतिनिधी

आलाप, जोड, झाला, गत वाजविताना सतारीचे निर्माण होणारे स्वर्गीय स्वर अन् शास्त्रीय गायनातून विविध रागांद्वारे निर्माण होणारे तितकेच उत्कट सुर ऐकून सोलापूरकर 'मुग्ध' झाले. निमित्त होते प्रिसिजन संगीत महोत्सवाचे.

प्रिसिजन फाऊंडेशन आयोजित आठव्या प्रिसिजन संगीत महोत्सवाचे उद्घाटन गायिका मुग्धा वैशंपायन यांच्या हस्ते शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिरात झाले. यावेळी प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजनचे संचालक रवींद्र जोशी, फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुधांशु चितळे, डॉ. किरण चितळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पूर्वा रागाने मुग्धा वैशंपायन यांनी सादरीकरणाची सुरेल सुरुवात केली. विलंबित त्रितालात पूर्वा रागातील 'अरे मना तू युँही दिन बिते' ही बंदिश सादर केली. हा प्रचलित रागांपेक्षा कांहीसा अनवट राग निवडून त्यांनी जाणकारांना सुखद धक्का दिला. त्यानंतर त्यांनी द्रूत त्रितालातील 
"अब कैसे जाऊँ धीट लंगर छेडत.." हा छोटा ख्याल सादर केला. पल्लेदार, ढंगदार बलपेचयुक्त दमसासाच्या तानांनी रसिकांची मने जिंकली.


राग भटियारमधील 'एक सूर चराचर छायो' या निर्गुणी भजनाने मुग्धा वैशंपायन यांच्या गायनाचा प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात समारोप झाला. त्यांना तबल्यावर अभिजीत बारटक्के यांनी तर संवादिनीवर हर्षल काटदरे यांनी साथसंगत केली.

महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक पंडित नयन घोष यांचे सतारवादन झाले. राग झिंझोटीने त्यांनी आरंभ केला. यात अतिउत्कृष्ट आलाप, जोड, झाला त्यांनी सादर केला. यानंतर सादर केलेल्या धूनलाही रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. त्यांना ईशान घोष यांनी तबलासाथ केली.

-------------
आज प्रिसीजन संगीत महोत्सवात.....

प्रिसीजन संगीत महोत्सवात रविवारी पहिल्या सत्रात पंडित अमोल निसळ यांचे गायन होणार आहे. तर दुसऱ्या सत्रात प्रख्यात बासरीवादक पं. रोणु मुजुमदार यांचे बासरीवादन होईल. त्यांना तबलासाथ पंडित अरविंदकुमार आझाद देणार आहेत. रसिकांनी ठिक ६.२५ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.