जय राजा शिवछत्रपतींचा जय मंगलमय हो....!

छत्रपती शिवाजी महाराज कथेनिमित्त निघाली भव्य शोभायात्रा : प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी यांचा सहभाग

जय राजा शिवछत्रपतींचा जय मंगलमय हो....!

सोलापूर : प्रतिनिधी

'जय राजा शिवछत्रपतींचा जय मंगलमय हो, श्री शिवछत्रपती जय हो'
म्हणत गुरुवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. समस्त हिंदू समाजातर्फे आयोजित श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र, अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज कथेनिमित्त या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी स्वतः या शोभायात्रेत सहभागी होऊन आयोजकांचा उत्साह वाढवला. बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला. प्रारंभी प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या हस्ते श्री मल्लिकार्जुन मंदिरात पूजा करण्यात आली. यानंतर शिवग्रंथाची पूजा करून हा ग्रंथ बग्गीत ठेवण्यात आला.

शोभायात्रेच्या अग्रभागी सजवलेल्या बैलगाडीत सनई चौघडा वाजत होता. त्यामध्ये हलगी पथक आणि भगवा ध्वज घेऊन तीन अश्वारूढ हिंदू तरुण सहभागी झाले होते. राजस्थानी मंडळाचे महिला पथक विविध गीते म्हणत शोभायात्रेची रंगत वाढवत होते. तर श्री शंकरलिंग मंदिराच्या महिला लेझीम पथकाने लेझीमचे आकर्षक डाव सादर करीत वातावरण भगवेमय केले. सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशनच्या चित्तथरारक शिवकालीन मर्दानी खेळाने शोभायात्रेतील उत्साह आणखी वाढला. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या बर्ची पथकाने आकर्षक सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. पतंजली महिला पथक, अक्कनबळग संस्थेच्या महिला पथकांनी विविध गीते, घोषणांनी शोभायात्रेत रंगत आणली.

सजवलेल्या बग्गीत प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी विराजमान झाले होते. तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी सनातन संस्थेकडून प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी यांचे औक्षण करण्यात आले.

संबळ पथक, तुतारी, शंखनाद, धनगरी ढोल, अणदूर आणि सोलापुरी हलगीने वातावरणात चांगलाच जोश भरला होता. तर वारकरी मंडळाच्या टाळ - मृदुंगाच्या पथकाने वातावरण भक्तीमय होत होते. शेकडो शिवभक्तांच्या उत्साही सहभागाने ही शोभायात्रा बाळीवेस, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, भागवत टॉकीजमार्गे जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये पोहोचली. या शोभायात्रेत शहर - जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते.