मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची सोलापुरात होणार जाहीर सभा
कधी आणि कुठे होणार सभा ? वाचा !
सोलापूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाद्वारे लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा येत्या गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण परिषद होणार आहे. या मराठा आरक्षण परिषदेच्या प्रसारासाठी मनोज जरांगे पाटील गुरुवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारशी झालेल्या चर्चेअंती मराठा समाजाने सरकारला आरक्षण जाहीर करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. परंतु सरकारवर मराठा आरक्षणाच्या मागणीचा दबाव रहावा आणि सरकारला मराठा समाजाची ताकद दिसावी याकरिता आंतरवली सराटी येथे १०० एकर जागेमध्ये भव्य आरक्षण परिषद होणार आहे. या परिषदेला मराठा समाज बांधवांनी हजर राहावे याकरिता मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठा समाज बांधवांना साद घालत आहेत.
सोलापुरात ५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता सोलापूर शहरात सभा झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता मंगळवेढा येथे तर सायंकाळी ७ वाजता पंढरपुरात सभा होणार आहे. त्याचबरोबर शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी बार्शी येथे सकाळी ११.३० वाजता तर कुर्डूवाडी येथे सायंकाळी ६.३० वाजता मनोज जरांगे पाटील सभा घेणार आहेत.
सोलापूर शहरातील सभेसाठी मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तसेच ज्या मराठा समाज बांधवांकडे कुणबी असल्याचे पुरावे असतील त्यांनी ते पुरावे येताना घेऊन यावे, असे आवाहन माऊली पवार यांनी याप्रसंगी केले.
या पत्रकार परिषदेस राजन जाधव, सूर्यकांत पाटील, श्रीकांत डांगे, प्रा. जी. के. देशमुख, प्रकाश ननवरे, प्रा. गणेश देशमुख, सचिन तिकटे उपस्थित होते.