रमाबाईसाहेब रानडे पुरस्कार डॉ. सुहासिनी शहा यांना प्रदान
सेवासदन शताब्दी स्मरणिकेचेही प्रकाशन
सोलापूर : प्रतिनिधी
पुणे सेवासदन संस्था सोलापूर शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या रमाबाईसाहेब रानडे पुरस्कार प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांना मंगळवारी डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी सेवासदन शताब्दी स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते थाटात करण्यात आले.
पुणे सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा वर्षा परांजपे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. याप्रसंगी व्यासपीठावर पुणे सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा वर्षा परांजपे, उद्योजक यतीन शहा, संस्थेचे सरचिटणीस चिंतामणी पटवर्धन, कार्यकारणी सदस्या अश्विनी गानू, सहसचिवा अर्चना शहाणे, सोलापूर शाखेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, सचिवा वीणा पतकी, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, विजया निसर, राजेंद्र गांधी, अमोल चाफळकर उपस्थित होते.
शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे रमाबाईसाहेब रानडे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरणानंतर 'अक्षरभेट शतकाची' या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. याप्रसंगी सेवासदन संस्थेच्या संकेतस्थळाचेही उद्घाटन डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते झाले.
यावेळी डॉ. सुहासिनी शहा यांची प्रकट मुलाखत अश्विनी मोरे - वाघमोडे यांनी घेतली. डॉ. शहा म्हणाल्या, नोकरी, व्यवसाय असो की सामाजिक कार्य, बदल स्वीकारला तर प्रगतीची द्वारे खुली होतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी पैशांबरोबर वेळेचेही व्यवस्थापन करणे क्रमप्राप्त आहे. प्रत्येकाने आयुष्याच्या विविध टप्प्यांवर सतत नवे शिकत राहण्याची सवय लावून घेतली तर यश नक्की मिळतेच. प्रिसिजन फाउंडेशन सध्या शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर काम करत आहे. भविष्यात पर्यावरण, नद्या रुंदीकरण आदी विषयातही प्रिसिजन फाउंडेशन कार्य करेल, असेही डॉ. सुहासिनी शहा यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी वर्षा परांजपे, शीला मिस्त्री, प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, डॉ. प्रिया निघोजकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
संस्थेच्या सचिवा वीणा पतकी यांनी प्रास्ताविक केले. रुपाली काळे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास उद्योजक दत्ता सुरवसे, करण शहा, मयुरा शहा, माजी महापौर सुशीला आबुटे, प्रा. नसीमा पठाण आदी उपस्थित होते.
------------
स्मरणिकेचे अनोखे प्रकाशन
सेवासदन संस्थेतर्फे स्मरणिकेचे अनोख्या पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. सेवासदन संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रकाशित केलेल्या स्मरणिकांच्या प्रती पालखीत ठेवून प्रकाशनासाठी व्यासपीठावर छोट्याशा मिरवणुकीने आणण्यात आल्या. या पालखीसोबत रमाबाई रानडे तसेच इतर मान्यवरांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.