धक्कादायक ! 'इतक्या' लोकांना अद्याप मिळालीच नाही लस

आता गरज जागृती आणि मदतीची

धक्कादायक ! 'इतक्या' लोकांना अद्याप मिळालीच नाही लस

सोलापूर : प्रतिनिधी

कोरोनावरील लसींबाबत भलीमोठ्या चर्चा, गोंधळ, मागणी होऊनही अद्याप ४५ वर्षांहून अधिक वयाच्या तब्बल एक लाख २० हजार २५० व्यक्तींना लस मिळालेलीच नाही. त्यामुळे आता सामाजिक संघटनांनी लस मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील वर्षात कोरोनाच्या भयंकर हाहाकारानंतर सर्वांनाच लसीची प्रतीक्षा होती. लस सोलापूरात आल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या विविध लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरूदेखील झाले. मात्र लसीकरण केंद्रांची अपुरी संख्या, लसींचा तुटवडा या कारणांमुळे सुरुवातीला लसीकरण संथ गतीने सुरू होते. 

ऑनलाईन नोंदणी करता येत नाही, केंद्रांवर गेल्यावर लस मिळत नाही, लसीकरण केंद्रांवरील प्रचंड गर्दी अशा कारणांमुळे ४५ वर्षांपुढील नागरिक लसीकरण केंद्रांवर येण्यास कचरत होते.

सोलापूर शहरात ४५ वर्षांपुढील एकूण दोन लाख चार हजार २८१ जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. यात ४५ ते ६० वयोगटातील ६१ हजार ५८६ नागरिकांचा तर ६० वर्षांपुढील एक लाख ४२ हजार ६९५ नागरिकांचा समावेश आहे.

यात २७ मे पर्यंत ४५ ते ६० वयोगटातील ६१ हजार ५८६ पैकी ४२ हजार ४५८ जणांनी पहिला डोस तर ७ हजार ९०६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
तर ६० वर्षांपुढील एक लाख ४२ हजार ६९५ नागरिकांपैकी ४१ हजार ५७३ जणांनी पहिला डोस तर १२ हजार ८१५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांपुढील एकूण दोन लाख चार हजार २८१ पैकी ८४ हजार ३१ जणांनी आजवर लस घेतली असून एक लाख २० हजार २५० नागरिकांना अद्याप लस मिळालेली नाही.

आता शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढून ३२ झाली आहे. सर्व लसीकरण केंद्रांवर पुरेशी लसही उपलब्ध आहे. मात्र रोज लसी शिल्लक राहत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

लस शिल्लक का राहत आहेत याचा अभ्यास केल्यास काही कारणे समोर येत आहेत. लसीसाठी ऑनलाईन नोंदणी अनेकांना करता येत नाही. परिणामी नागरिक लसीपासून वंचित राहत आहेत. एकीकडे नागरिक लस घेण्यासाठी उत्सुक असताना काही नागरिकांच्या मनात अद्याप लसीबाबत संभ्रम किंवा भीती आहे. लस घेतल्यानंतर काही त्रास होईल अशी विनाकारण भीती वाटत असल्याने काही जणांनी लस घेणे टाळले आहे. यावर आता जागृती आणि मदतीची गरज आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक सहभागाची आवश्यकता आहे.

सामाजिक संघटनांनी घ्यावा पुढाकार

सामाजिक संस्था, संघटना, गणेशोत्सव मंडळे, नवरात्र उत्सव मंडळे, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच विविध महापुरुषांच्या जयंती, उत्सव साजरे करणाऱ्या युवकांची आता खरी गरज आहे. युवकांनी आपल्या संस्था, संघटनांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन नागरिकांना घरोघरी जाऊन ऑनलाईन शेड्युल घेऊन देण्याचे काम केले तर लवकरात लवकर ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होऊ शकेल. 
-----------------------------
१८ ते ४४ चे पावणे चार लाख जण लसीच्या प्रतिक्षेत

सोलापूर शहरात १८ ते ४४ या वयोगटातील तब्बल तीन लाख ६६ हजार २७६ जणांना लसीकरण करायचे आहे. यातील केवळ चार हजार १७८ जणांना लस मिळाली आहे. अद्याप तीन लाख ६२ हजार जण लस मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या वयोगटातील नागरिकांना लवकरात लवकर लस मिळावी अशी मागणी सर्वस्तरांतून होत आहे.