अबब ! सोलापूरात कोरोनामुळे ५०२ मृत्यू

मास्क हाच संसर्ग प्रतिबंधाचा उपाय

अबब ! सोलापूरात कोरोनामुळे ५०२ मृत्यू

महाबातमी

सोलापूर : प्रतिनिधी

कोरोना महामारीमुळे सोलापूर शहरात झालेल्या मृत्यूने आज तब्बल ५०० चा आकडा पार केला. शहरात आज कोरोनामुळे ४ मृत्यूंची नोंद झाली. हिवाळ्याच्या तोंडावर आता यापुढे तरी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मास्क लावण्यासह इतर खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.

देशभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना ११ एप्रिलपर्यंत सोलापूर शहरात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नव्हता. १२ एप्रिल रोजी एक रुग्ण मिळाल्यानंतर मात्र सोलापूरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला. यात आजवर ८५ हजार ६७४ जणांची तपासणी करण्यात आली. यातून ७६ हजार ६२९ जण निगेटिव्ह तर तब्बल ९ हजार नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. यातील ७ हजार ७१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ८२९ रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत.

साडेसात हजार रुग्ण बरे होणे ही जरी समाधानाची बाब असली तरी मृत्यूचा आकडा तब्बल ५०० च्या वर जाणे ही सोलापूरकरांच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता सोलापूरकरांनी शून्य रुग्ण संख्येच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सामाजिक भान आणि कठोर नियम पालन यांची आवश्यकता आहे. 
-------
सोलापूरकर नाहीत गंभीर ?
इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत असूनही अद्याप सोलापूरकर याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. शासन, सामाजिक संघटना, माध्यमे यांच्या माध्यमातून वारंवार जनजागृती करूनही अनेक नागरिक नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. अशा नियम तोडणाऱ्या नागरिकांवर प्रशासन आणि पोलिसांनी आणखी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
------
संसर्ग वाढू नये म्हणून काय करावे ?

मास्क वापरणे अत्यावश्यक.
गरज असेल तरच घराबाहेर पडा.
 सॅनिटायझरचा वापर करा.
सोशल डिस्टनसींग पाळा.
 गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.