राज्यात पुन्हा येतीय कोरोनाची लाट : मुख्यमंत्री ठाकरे

कोरोना लसीसाठी टास्क फोर्स

राज्यात पुन्हा येतीय कोरोनाची लाट : मुख्यमंत्री ठाकरे

 सोलापूर : प्रतिनिधी

कोरोनाची लाट पुन्हा येत आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र अतिशय सावधपणे पाउले टाकत आहे. अशा परिस्थितीत लसीकरण आणि तिचे वितरण याबाबत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

आज (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील आठ राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. 

याप्रसंगी नीती आयोगाने येणाऱ्या लसीची निर्मिती, वितरण याबाबत सादरीकरण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसेच कंटेन्मेंट क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल.

कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक आहे. लसीची उपलब्धता, लसीची संख्या, लसीचे दुष्परिणाम, लसीचा परिणाम, लसीवरील येणारा खर्च व त्याचे वितरण याबाबतीत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असून त्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा केली जाणार आहे. 

११ कोटी नागरिकांचा आरोग्य डेटा

राज्यात दोन टप्प्यात राबविण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या मोहिमेत प्रत्येक घरी आरोग्य चौकशी करण्यात आली आहे. ११ कोटी ९२ लाख लोकांचा आरोग्य डेटा आपल्याकडे आहे. यातून राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत होणार आहे. या मोहिमेत ३.५ लाख सारी आणि आयएलआयचे रुग्णही सापडले तसेच ५१ हजार कोरोना रुग्ण आढळले ज्यांच्यावर उपचार करण्यात आले अशी माहितीही त्यांनी दिली.  

कोविडनंतरचे परिणाम गंभीर

कोविडमधून बऱ्या झालेल्या  काही रुग्णांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या देखील आढळत असून यावरही आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. आज राज्यात दररोज ७० ते ८० हजार चाचण्या होत असून आरटीपीसीआर चाचण्या अधिक वाढविण्याचे तसेच संसर्गग्रस्त व्यक्तीचे जास्तीतजास्त संपर्क शोधण्यास सांगण्यात आले आहे.
------------------
नियमित वाचा 'महाबातमी' न्यूज पोर्टल
संपर्क :- पुरुषोत्तम कारकल
९८६०८२२२८३