अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात ९०५ कोटींचे नुकसान

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात ९०५ कोटींचे नुकसान

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 935 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले असून शासनाकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, असेही त्यांनी आज सांगितले.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी  आज बैठक घेतली. जिल्हाधिकारी बहुउद्देशिय सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

श्री.भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शेती, रस्ते, पाणीपुरवठा योजना, जलसंपदा विभागाकडील नुकसान यांची एकत्रित माहिती घेतली असता हे नुकसान सुमारे 935 कोटी 28 लाख रुपयांचे असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. याबाबत सर्वांकश अहवाल शासनास पाठविण्यात आला असून जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन असेही पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रवीद्र माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अधीक्षक ‍अभियंता सतोष शेलार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिल ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी.दुधभाते आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता

युरोप मधील काही देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येत आहे. या पार्श्वभूमीवर  आपल्या देशातही संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले.

मास्क वापरला नाही तर नागरिकांना 500 रुपयांचा दंड करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. ही मोहिम प्रभावीपणे राबावावी जेणेकरुन नागरिकांच्यात मास्क वापरण्याबाबत जाणिवजागृती होईल. अशा सूचना श्री. भरणे यांनी दिल्या.