अरे बापरे ! सोलापूरहून निघालेल्या रेल्वे इंजिनला आग
कुठे झाली घटना ? वाचा
सोलापूर : प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ नजीक असलेल्या घाटणे गावाजवळ रेल्वे इंजिनला आग लागल्याची घटना आज रविवारी थोड्या वेळापूर्वी घडली आहे.
गाडी क्रमांक १२६२७ बेंगलोर - दिल्ली कर्नाटका एक्सप्रेस (के.के. एक्सप्रेस) नेहमीप्रमाणे सोलापूर रेल्वे स्थानकावरून निघाली. ही गाडी मलिकपेठ जवळ आल्यानंतर अचानक इंजिन फेल झाल्याने इंजिनला आग लागल्याचे सांगण्यात आले. इंजिनला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी तत्काळ थांबवली. यावेळी आग विझवण्याच्या प्रयत्नात इंजिन चालक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. या रेल्वे चालकाला मोहोळ येथे उपचारासाठी पाठवल्याचे सांगण्यात आले.
काही मिनिटातच ही वार्ता प्रवाशांमध्ये हा हा म्हणता पसरली आणि एकच गोंधळ उडाला. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना शांत केले. रेल्वे इंजिनला आग लागल्याचे कळतात लोकनेते शुगरच्या तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
केके एक्सप्रेसचे इंजिन फेल झाल्याने त्वरित सोलापूर स्थानकावरून दुसरे इंजिन पाठवून गाडी रवाना करण्यात आली.