एकाचवेळी ९०९ कुटुंबांनी केले गोवऱ्यांचे ज्वलन
वातावरण शुद्धीसाठी होते मदत
सोलापूर : प्रतिनिधी
एकाचदिवशी एकाचवेळी सोलापूरातील तब्बल ९०९ कुटुंबांनी देशी गाईंच्या शेणाच्या गोवऱ्यांचे ज्वलन करण्याचा उपक्रम राबविला. हवा शुद्ध होण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण वाढण्यासाठी याचा मोठा उपयोग झाला असल्याचे संयोजकांनी सांगितले.
राम सेवा समिती, राधारानी भजनी मंडळ, सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटन, माहेश्वरी प्रगती मंडळ महिला शाखा यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
वरुथिनी एकादशीच्या मुहूर्तावर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता हा उपक्रम घराघरांत करण्यात आला. देशी गाईच्या दोन गोवऱ्या देशी गाईचे तूप, काही दाणे तांदूळ आणि थोडासा कापूर टाकून जाळण्यात आल्या. देशी गाईचे तूप आणि गोवऱ्या जाळल्याने हवेतील अनेक जंतू नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात बदल व्हावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे गोपाल सोमाणी यांनी सांगितले.
यानंतर प्रत्येकाने सहकुटुंब रामरक्षा पाठ करावा असे आवाहन राम सेवा समिती, राधारानी भजनी मंडळ, सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटन, माहेश्वरी प्रगती मंडळ महिला शाखा यांच्यावतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन ९०९ कुटुंबीयांनी रामरक्षाही म्हटली. सोलापूरकरांनीही हा उपक्रम घरात करावा, असे आवाहन गोपाल सोमाणी यांनी यावेळी केले.