स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची मोटार रॅली

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले उद् घाटन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची मोटार रॅली

सोलापूर : प्रतिनिधी

 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनमार्फत मोटार गाड्यांवर ‘हर घर तिरंगा’चे बॅनर लावून रॅली काढण्यात आली. रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हिरवा झेंडा दाखवून केला.

ही मोटार रॅली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, आयटीआय कार्यालय, सात रस्ता, रेल्वे स्टोशन, भैय्या चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रंगभवन ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अशी झाली. 

येत्या १५ ऑगस्टला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत आहेत. नागरिकांच्या मनामध्ये आपल्या तिरंग्याविषयी प्रेम निर्माण व्हावे, तिरंग्याचे महत्व समजावे. यासाठी देशभरात आझादी अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे. आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेल्या मोटार रॅलीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी रॅलीमध्ये सहभागी मोटार वाहनधारकांचे आभार व्यक्त करून कौतुक केले. ५० वाहने शहरासह तालुक्यात जावून हर घर झेंड्याविषयी जनजागृती करणार आहेत. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन आपल्या घरावर झेंडा लावण्यासाठी ठिकठिकाणच्या स्टॉलवरून खरेदी करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्यासह ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.