धक्कादायक ! दलित कर्मचाऱ्यावर ओतल्या गटारीच्या पाण्याच्या बादल्या

माजी नगरसेवक रियाज हुंडेकरीवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

धक्कादायक ! दलित कर्मचाऱ्यावर ओतल्या गटारीच्या पाण्याच्या बादल्या

सोलापूर : प्रतिनिधी

गटारीची पाहणी करण्यासाठी आलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या दलित कर्मचाऱ्यावर गटारीच्या पाण्याच्या बादल्या ओतल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार ७० फूट रोड येथील मस्जिदच्या बोळात घडला. याबाबत माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी महादेव शेरखाने यांनी फिर्याद दिली आहे. महादेव शेरखाने हे ७० फूट रोड येथील मस्जिदच्या बोळात सार्वजनिक गटार तुंबल्याने त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी या प्रभागाचे माजी नगरसेवक आरोपी रियाज हुंडेकरी याने 'ये क्या है' असे म्हणून महादेव शेरखाने यांचे हात धरून अनुसूचित जाती जमातीचा असताना जाणीवपूर्वक अपमानित करण्याच्या उद्देशाने आरोपी रियाज हुंडेकरीच्या सोबत असणाऱ्या तिघांना गटारीचे मैला मिश्रित पाणी भरलेल्या बादल्या महापालिकेचे कर्मचारी महादेव शेरखाने यांच्या अंगावर ओतण्यास लावल्या.

फिर्यादी महादेव शेरखाने यांना सार्वजनिक ठिकाणी जाणीवपूर्वक अपमानित करून महादेव शेरखाने यांचे नसलेले शासकीय काम त्यांना जबरदस्तीने करण्यास भाग पाडले. तसेच धाक दडपशाही करून मारहाण केली. या मारहाणीत महादेव शेरखाने गटारीत पडले. त्यामुळे त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्यास जबरदस्त मार लागून त्यांचे लिगामेंट तुटले. याबाबत महादेव शेरखाने यांनी पोलिसांत धाव घेतल्याने माजी नगरसेवक आरोपी रियाज हुंडेकरी याच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.