रेल्वेच्या जागेवरील १३०० अतिक्रमणांवर पडणार हातोडा

अतिक्रमण केलेल्यांना रेल्वेने दिला अखेरचा इशारा

रेल्वेच्या जागेवरील १३०० अतिक्रमणांवर पडणार हातोडा

सोलापूर : प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील अतिक्रमण झालेल्या तब्बल १३०० जागांवर आता हातोडा पडणार आहे. मंगळवारपासून (ता. २६) अतिक्रमण काढण्याच्या मोहीमेला प्रारंभ होणार आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वेची मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागा आहेत. ज्या जागेत रेल्वे मार्ग किंवा रेल्वे विभागाच्या इमारती, कार्यालये नाहीत अशा मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे हटविण्याचा प्रयत्न यापूर्वी काहीवेळा झाला. मात्र या मोहीमेला अंशत: प्रतिसाद मिळाला.

यंदा अतिक्रमण १३०० पैकी जुळे सोलापूर आणि परिसरातील ४५० नागरिकांना अतिक्रमण काढण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यातील ४५ जणांची मुदत मंगळवारी (ता. २६) संपत आहे. त्यामुळे त्यादिवशी अतिक्रमण काढण्याच्या कामास सुरुवात होणार आहे. याबाबतची माहिती संबंधितांना व्हावी यासाठी रेल्वे विभागाकडून ध्वनीवर्धकाच्या माध्यमातून सूचना देण्यात आली. उर्वरित सकाळी अतिक्रमणे ही टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार आहेत असे सांगण्यात आले.

------------

अतिक्रमण काढणारच

 मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील जागांवर असलेले अतिक्रमण काढण्याची सुरुवात २६ एप्रिल पासून होणार आहे. उर्वरित अतिक्रमणे देखील टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार आहे.

-- प्रदीप हिरडे, विभागीय वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, मध्य रेल्वे सोलापूर विभाग