सोलापूर : प्रतिनिधी
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मनुष्यहानी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने लोकांपर्यंत संदेश तत्काळ पोहोचवावे. नदीकाठावरील ६२३ गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यासह आपत्ती घडण्यापूर्वी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पुनर्वसनचे उपजिल्हाधिकारी सुनिल टोंपे, प्रांताधिकारी ज्योती कदम, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्यासह सर्व तहसीलदार, पोलीस यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. शंभरकर म्हणाले, आपत्ती अचानकपणे येत असल्याने त्यादृष्टीने आवश्यक पूर्वतयारी करावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून अधिकाऱ्यांनी पाहणी करून आपत्तीची शक्यता असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करावी. पालखी सोहळ्याच्या वेळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन पालखी मार्गावरील उताराच्या ठिकाणी आणि पाणी साचत असलेल्या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. आपत्ती व्यवस्थापनाच्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
आपत्तीसाठी अद्ययावत वाहनाची सोय करण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. प्रत्येक तालुक्याने एक वाहन उपलब्ध करून घ्यावे. नगरपालिकेच्या ठिकाणी फायर ब्रिगेडची सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे व्यवस्थापन करण्यासोबत मोठ्या पावसामुळे नदीपात्रात होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत आवश्यक सूक्ष्म नियोजन करावे. नदीकाठावरील ६२३ गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यासोबत त्या गावातील एक व्यक्ती संपर्कासाठी नेमणे आवश्यक आहे. आपत्ती आल्यास नुकसान होणार नाही याचे नियोजन आधी करावे.
विविध विभागांनी आवश्यक साधने आणि मनुष्यबळ याबाबतची माहिती तत्काळ कळवावी. महावितरण, पोलीस, आरोग्य याबरोबर सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. उजनी धरण पाणी स्थितीची माहिती वेळोवेळी सर्वांना दिली तर नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला तर उपाययोजना करता येईल. आरोग्य विभागाने साथ रोगाविषयी दक्षता घ्यावी. सर्व साधनसामग्री, औषधे वेळेत खरेदी करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पवार यांनी आपत्ती व्यवस्थेबाबत सर्वांना जागरूक केले. प्रत्येक गावातील एका व्यक्तीला कार्यकर्ता म्हणून नेमून त्यांच्याद्वारे जागृती करावी. प्रत्येक विभागाने आपत्तीमध्ये बचाव कार्यासाठी लागणारे साहित्याची उपलब्धता आहे का...वाहतूक साधने, पूर्वसूचना गट, शोध व बचाव गट याची माहिती दिली.
प्रथमोपचारासाठी गावातील डॉक्टर यांचे संपर्क क्रमांक अद्ययावत करावेत, नदीकाठच्या गावांची यादी, परिसरात सामाजिक काम करणाऱ्यांची यादी करा. जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून याठिकाणी तसे फलक लावावेत. जिल्ह्यातील पाच तालुक्यात वारंवार पूरपरिस्थिती उदभवते, त्या तालुक्यात मान्सूनपूर्व तयारीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले.
महाबातमी न्यूज पोर्टल
संपादक - पुरुषोत्तम कारकल, सोलापूर
ताज्या बातम्या, अपडेटस मिळवण्यासाठी खालील नंबर आपल्या वॉट्स एप ग्रुपमध्ये एड करा.
९८६०८२२२८३
पत्रकारिता ही जनतेच्या कल्याणासाठीच असते असे ठाम मत घेऊन पत्रकारिता करतो. पत्रकारिता करताना कोणाच्याही रुपयाला मिंधा न होता निर्भीडपणे पत्रकारिता करता यावी हीच ईश्वराकडे प्रार्थना !
- पुरुषोत्तम कारकल, सोलापूर
purushottam.karkal@gmail.com