'जीएसटी' ची अंमलबजावणी व्हावी सुटसुटीत
मागणीसाठी देशभर देणार निवेदने
सोलापूर : प्रतिनिधी
वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्यातील अत्यंत जाचक अटी आणि किचकट संगणक प्रणालीच्या विरोधात ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनतर्फे उद्या (शुक्रवारी) देशभर निवेदने देण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. रुद्रमुनी हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय कर कार्यालय आणि राज्य कर कार्यालय येथे सकाळी ११ वाजता निवेदन देण्यात येणार आहेत.
जीएसटीची अंमल बजावणी करताना कायद्यात सतत बदल करणे, अनेक परिपत्रके काढणे, निरनिराळे खुलासे करणे, कराच्या दरात विविधता असणे , संगणक प्रणाली अत्यंत किचकट असणे यामुळे व्यापारी आणि करसल्लागारांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी देशभर केंद्र व राज्य शासनाला निवेदन देण्यात येणार आहे.
देशात वस्तू व सेवा कर कायदा लागू होऊन ४३ महिने झाले परंतु अद्यापही यात सहजता आलेली नाही. या कायद्याची अंमलबजावणी सोपी व सुटसुटीत करावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून देशभर केली जाणार असल्याचे अध्यक्ष एड. हिरेमठ यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस इन्कम टॅक्स अँड सेल्स टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशनचे उपाध्यक्ष एड. इद्रिस बागवान, सचिव एड. किसन बिल्ला, सहसचिव ऍड. अक्षय अंदोरे, ऍड. एम.पी. कोरुलकर, ऍड. विजयकुमार कोनापुरे, ऍड. अरविंद शहा
आदी उपस्थित होते.