शहर विकास व नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यास राहील प्राधान्य !

महापालिकेच्या नूतन आयुक्त शीतल तेली - उगले यांनी घेतला पदभार

शहर विकास व नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यास राहील प्राधान्य !

सोलापूर :  प्रतिनिधी

शहराचे प्रश्न सोडविणे आणि येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यास प्राधान्य राहील तसेच महत्त्वाच्या विषयांची माहिती घेऊन त्यादृष्टीने काम करणार असल्याचे महापालिकेच्या नूतन आयुक्त शितल तेली - उगले यांनी सांगितले.
      
सोलापूर महापालिकेच्या नूतन आयुक्त शीतल तेली -उगले यांनी आज सकाळी महापालिकेत रुजू झाल्या आहेत. यावेळी त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी नूतन आयुक्त यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महापालिका पत्रकार संघाच्या वतीने नुतन आयुक्त शीतल तेली - उगले यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

आज सोमवारी सकाळी नुतन आयुक्त शीतल तेली-उगले यांचे महानगरपालिकेत आगमन झाले. औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्या म्हणाल्या, शहराचे प्रश्न सोडविणे आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करणे याला प्राधान्य राहील. महत्त्वाच्या योजना व विषयांची माहिती घेऊन त्या दृष्टीने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरवासीयांच्या अनेक गरजा आणि समस्या या महापालिकेच्या संबंधित असतात. नागरिकांचे दैनंदिन जीवन कसे सुखकर करता येईल आणि शहराचा विकास कसा होईल याकडे माझे व महापालिका प्रशासनाचे लक्ष राहील असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेत पदभार घेतल्यानंतर नूतन आयुक्त शीतल तेली - उगले यांचे सर्व अधिकारी ,विभाग प्रमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पदभार घेतल्यानंतर तातडीने नव्या आयुक्तांनी महापालिकेच्या उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि सर्व विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेऊन माहिती घेतली. आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी  उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त विद्या पोळ, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील, मुख्य लेखापाल रूपाली कोळी, नगर अभियंता संदीप कारंजे, आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक राहुल कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकारी व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

नूतन आयुक्त शितल तेली-उगले या मुळच्या नगर जिल्ह्याच्या आहेत. २००७ साली दिलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून शितल तेली-उगले यांना आयआरएस म्हणजेच भारतीय महसूल सेवेत संधी मिळाली. त्यानंतर प्रशिक्षण कालावधी सुरु असतानाच पुन्हा केलेल्या प्रयत्नामध्ये त्यांना २००९ मध्ये आयएएस म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवेत यश मिळाले. देशात त्यांचा ३७ रँक आला. त्या महाराष्ट्रात टॉपर होत्या. भारतीय प्रशासकीय सेवेला प्रारंभ झाल्यानंतर त्यांनी प्रथम चंद्रपूर येथे असिस्टंट सीईओ म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. यानंतर त्या जळगाव येथे असिस्टंट सीईओ, रायगड येथे जिल्हाधिकारी, पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त, नागपूर येथे एमएमआरडीएचे संचालक, नागपूर येथील वस्त्रोद्योग संचालक म्हणून सेवा बजावली. या दरम्यान त्यांनी प्रशासनावरील उत्कृष्ट कामगिरीने उमटविलेली वेगळी छाप यामुळे त्या प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट अधिकारी म्हणून गणल्या जातात.