ज्ञानमहर्षीच्या अभिष्टचिंतनास शिक्षणनिष्ठांची मांदीयाळी
प्रा. ए. डी. जोशी यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव
सोलापूर : प्रतिनिधी
सभागृहाच्या बाहेर धो धो बरसणारा पाऊस.... तर सभागृहात तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा मोठ्याने होणारा शुभेच्छांचा वर्षाव.... असे आनंददायी वातावरण सोलापूरकरांनी अनुभवले. निमित्त होते ज्ञानमहर्षी प्रा. ए. डी. जोशी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अभिष्टचिंतनास जमलेल्या शिक्षणनिष्ठांच्या मांदीयाळीचे !
शिक्षण क्षेत्रात तब्बल ५३ वर्षे योगदान दिलेल्या प्रा. ए. डी. जोशी यांचा सत्कार सोलापूरकरांच्या वतीने इंडियन मॉडेल स्कूलच्या सभागृहात करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, आ. सुभाष देशमुख, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, दै. सकाळचे निवासी संपादक अभय दिवाणजी, दै. पुण्यनगरी चे व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सुधीर खरटमल, डॉ. अग्रजा वरेरकर, इंडियन मॉडेल स्कूलचे संचालक अमोल जोशी, संचालिका सायली जोशी आदी उपस्थित होते.
माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे म्हणाले, रा एडी जोशी यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडवले आहे त्यांनी घडवलेले विद्यार्थी राज्यात देशात उच्च पदावर कार्यरत आहेत सोलापूरच्या शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे सोलापूरला शिक्षणाचे हब बनवण्यामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, प्रा. ए. डी. जोशी यांनी पिढी घडवली. इंडियन मॉडेल स्कूलचे स्वप्न पाहून ते पूर्णत्वास नेले. शिक्षक हे पद खऱ्या अर्थाने ज्यांना शोभून दिसते, असे शिक्षक म्हणजे प्रा. ए. डी. जोशी आहेत.
दै. सकाळचे संपादक अभय दिवाणजी म्हणाले, आचार, विचार आणि संस्कारांचा मिलाप प्रा. ए. डी. जोशी यांच्यात आणि त्यांनी केलेल्या कार्यातून दिसून येतो. इंग्रजी शाळा असूनही भारतीय विचार देण्याचे कार्य प्रा. जोशी यांनी केले आहे. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर उभे राहिलेल्या इंडियन मॉडेल स्कूल चा नावलौकिक राज्यात सर्वत्र आहे ही सोलापूरसाठी अभिमानाची बाब आहे, असेही श्री दिवाणजी यावेळी म्हणाले. याप्रसंगी माजी आमदार दिलीप माने, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सुधीर खरटमल, पोलीस उपयुक्त बापू बांगर आदींनी मनोगत व्यक्त केले.
प्रा. ए. डी. जोशी यांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सोलापुरातील शिक्षण क्षेत्रासह साहित्य, कला, सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मंडळींनी एकच गर्दी केली होती.