पितामह भीष्म महाभारतामधील अद्भूत व्यक्तीमत्व
विवेक घळसासी : समर्थ बँकेतर्फे वाग्यज्ञ
सोलापूर : प्रतिनिधी
निष्ठा आणि ध्येयवादी विचाराने प्रेरित असलेले पितामह भीष्म हे अद्भूत व्यक्तीमत्व होते, असे प्रतिपादन अमृतवक्ते विवेकजी घळसासी यांनी केले. समर्थ सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाभारत या विषयावर तीन दिवस वाग्यज्ञाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये दुसऱ्या दिवशी पितामह भीष्म यांच्या विविध गुणांची आणि पराक्रमांची महती त्यांनी सांगितली.
पितामह भीष्म महाभारता मधील महत्वाचे पात्र होते. आपल्या पित्यासाठी त्यांनी घेतलेली अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा ती त्यांनी जीवनाच्या अखेरपर्यत निभावली. महापराक्रमी पितामह हे सर्वश्रेष्ठ होते. अनेकवेळा अपमान होवूनही त्यांनी दाखवलेला संयम त्यातून त्यांनी जिवनात कशा प्रकारे वागले पाहिजे याचे उदाहरण घालून दिले. महाभारताला हजारो वर्ष झाली तरी आजही पितामह भीष्म यांच्या विचारावरच आपला देश वाटचाल करीत आहे. तेजस्वी वृत्ती असलेले पितामह भीष्म त्यांच्या विचाराने आजही अजरामर आहेत. आजच्या परिस्थितीचे वर्णन महाभारतकालात झाले आहे. राष्ट्रहितापेक्षा व्यक्तीगत हित वरचढ झाले की अध:पतन सुरू होते. असेही विवेकजी घळसासी यांनी आपल्या अमृतवाणीतून सांगितले.
महाभारत या विषयावरील वाग्यज्ञाच्या दुसऱ्या दिवशीचा प्रारंभ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे तसेच बँकेचे हितचिंतक आणि जुने खातेदार व्यापारी माणिक गोयल, उज्वल कोठारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि समर्थ रामदासाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर बँकेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे आणि अमृतवक्ते विवेकजी घळसासी यांचा शाल पुष्पहार देवून स्वागत करण्यात आले. यावेळी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे, उपाध्यक्ष राजन जांबोटकर, संचालक श्रीनिवास कुमठेकर, अॅड श्रीकृष्ण कालेकर, पंचागकर्ते मोहन दाते, रमेश कोल्हापुरे, प्रशांत बडवे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत बडवे यांनी केले. वाग्यज्ञाचा तिसऱ्या दिवशी बुधवार दि. २० ऑक्टोबर रोजी महानायक श्रीकृष्ण या विषयावर होवून समारोप करण्यात येणार आहे.