लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर १०१ जणांचे रक्तदान
अमृतवेला ट्रस्ट व श्री गुरुनानक दरबार यांचा उपक्रम
सोलापूर : प्रतिनिधी
सध्या सुरू असलेल्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर अमृतवेला ट्रस्ट सोलापूर आणि श्री गुरूनानक दरबार यांच्यावतीने आयोजित शिबिरात रविवारी १०१ जणांनी रक्तदान केले.
गुरुनानक नगर येथील श्री गुरुनानक दरबार येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सकाळी जपजी साहेब मंत्राचा पाठ करून आणि श्री गुरुनानकजी यांची प्रार्थना करून रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले. या शिबिरात १०१ जणांनी रक्तदान केले. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोनावरील लस देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. लस घेतल्यानंतर सुमारे दोन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, असे हरिष कुकरेजा यांनी सांगितले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी हरिष कुकरेजा, इंदरलाल होतवानी, केशवदास कुकरेजा, गागनदास कुकरेजा, राम कुकरेजा, लक्ष्मण होतवानी, तुलसीदास कुकरेजा, अनिल होतवानी, रवी होतवानी, किशोर होतवानी आदी उपस्थित होते. दमाणी रक्तपेढीने रक्तसंकलन केले.