आईचे छत्र हरपलेल्या मुलींना आई प्रतिष्ठानकडून दिवाळीचे किट
नवे कपडे, फराळ, दिवाळी साहित्याची दिली भेट
सोलापूर : प्रतिनिधी
आईचे छत्र हरपलेल्या मुलींना आई प्रतिष्ठानकडून दिवाळीचे किट भेट देण्यात आले. नवे कपडे, फराळ, दिवाळी साहित्य देऊन आई प्रतिष्ठानने ५ शाळांतील अशा मुलींची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम केला.
पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत गुरुवारी हा उपक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, उद्योजक वैभव पाटील, भू. म. पुल्ली कन्या प्रशालेच्या प्राचार्या गीता सादुल, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, कुचन प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे, सामाजिक कार्यकर्ते संजय साळुंखे, आई प्रतिष्ठानचे सचिव योगेश डांगरे, उपाध्यक्ष सचिन हिरेमठ, वसंत जाधव, प्रताप महावरकर, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम पर्यवेक्षिका जाहेदा जमादार, दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन जोकारे, दादाराव चव्हाण, अविनाश शंकू, सूर्यकांत जिंदम, विवेक नक्का उपस्थित होते.
प्रारंभी व्याहाती होम आणि सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थिनींना दिवाळीचे किट भेट देण्यात आले. यात दिवाळीसाठीचे नवे कपडे, फराळ, पणत्या आदी दिवाळीचे साहित्य यांचा समावेश होता. पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर म्हणाल्या, प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे महत्व खूप असते. मातृछत्र हरपलेल्या मुलींना आधार देण्याचे काम आई प्रतिष्ठान करत आहे. अशा मुलींना दिवाळी किट देण्याचा हा कौतुकास्पद उपक्रम आहे. मुलींनी मोठी स्वप्ने पहावीत. स्वावलंबी बनावे. उच्च शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहनही यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी केले.
आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले. सविता चिप्पा यांनी सूत्रसंचालन केले.
-----------------
आईच्या आठवणीने पोलिस उपायुक्त झाल्या भावूक
वडिलांनी वैद्यकीय उपचारांसाठी दिलेले पैसे उपचार न घेता माझी आई मला ते पैसे शिक्षणासाठी देत असे. आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आईने केलेल्या त्यागाची आठवण सांगताना पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर भावुक झाल्या.