दयावान ग्रुपच्या दहीहंडीत अवतरली चांद्रयानाची प्रतिकृती
दहीहंडी मिरवणुकीत सोलापूरकरांचा उत्साह शिगेला ! पहा व्हिडिओ !
सोलापूर : प्रतिनिधी
गोपाळकाल्याच्या निमित्ताने दयावान ग्रुपतर्फे गुरूवारी बाळीवेस येथील विजयी चौकात आयोजिलेल्या दहीहंडीत चांद्रयानाची प्रतिकृती अवतरली. शहरात निघालेल्या दहीहंडी मिरवणुकीत सोलापूरकरांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. माजी नगरसेवक विनायक विटकर यांनी या दहीहंडीचे आयोजन केले होते.
प्रारंभी बाळीवेस येथील विजयी चौकात उभारलेल्या चांद्रयानाच्या देखाव्याचे उद्घाटन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकारी संदिप शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे, माजी नगरसेवक अनंत जाधव, महेश तापडिया, सोलापूर महानगपालिकेचे माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, संजय कोळी, राजकुमार पाटील, संयोजक आणि दयावान ग्रुपचे अध्यक्ष माजी नगरसेवक विनायक विटकर, पापाशेठ दायमा, शंकर चौगुले, लक्ष्मण विटकर, दीपक जाधव, रमेश राठी, योगेश कूंदुर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनानंतर गोविंदा पथकांतील तरुणांचा विविध गीतांवर प्रचंड जल्लोष सुरु झाला. प्रारंभी वडार समाज बाळीवेस पथकाकडून पाच थर लावून सलामी देण्यात आली. यानंतर याच पथकाने सोलापूरकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादात चार थर लावून दहीहंडी फोडली.
दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांतील गोविंदा विजयी चौकात वाजत गाजत येत होते. त्यांच्यावर पाणी, गुलाल तसेच पुष्पवृष्टी करण्यात येत होती. विविध मंडळाचे टी-शर्ट परिधान केलेले युवक उत्साही वातावरणात नृत्य करत होते. भगव्या टोप्या परिधान केलेले युवक मोठ्या प्रमाणावर दिसून येत होते. दयावान ग्रुपची दहीहंडी फुटताच उपस्थित सोलापूरकरांनी टाळ्यांचा एकच कडकडाट कडकडाट करीत जल्लोष केला. यावेळी हा कार्यक्रम पाहण्यासाठी सोलापूरकरांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. काशीनाथ भतगुणकी यांनी सूत्रसंचालन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दयावान ग्रुपचे मनोज विटकर, अशोक अलकुंटे, सचिन इरकल, शाम मुद्दे, नागेश अलकुंटे, लखन इरकल, पंकज विटकर, वैभव मुद्दे, जुगल अलकुंटे यांनी परिश्रम घेतले.
भुलाभाई चौक, रविवार पेठ, बाळीवेस, वडार गल्ली तसेच शहराच्या विविध भागात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.