लोकमंगलचा सामूहिक विवाह सोहळा १५ डिसेंबर रोजी
विवाह नोंदणी सुरू : अंतिम मुदत मंगळवारपर्यंत
सोलापूर : प्रतिनिधी
लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी होणारा सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा यंदा १५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता गोरज मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. हा फौंडशनतर्फे होणारा ४२ वा सामुदायिक विवाह सोहळा आहे, अशी माहिती लोकमंगल फौंडेशनच्यावतीने देण्यात आली.
विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक, लोकमंगल नागरी पतसंस्था, लोकमंगल मल्टीस्टेट आदी एकूण १२५ पेक्षा जास्त माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणीसाठी १० डिसेंबर अंतिम तारीख आहे. या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विकास नगर येथील लोकमंगल फौंडेशनच्या ऑफीसला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, वर्हाडी मंडळीच्या भोजनाची सोय, मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येणार आहेत. तसेच ताट, वाटी, ग्लास प्रत्येकी ५ नग, स्टील हंडा, स्टील डबा, तांब्या आदी संसारोपयोगी साहित्यही देण्यात येणार आहे. वधू- वरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूकही काढण्यात येणार आहे.
------
आतापर्यंत ३०८९ जोडपी विवाहबद्ध
लोकमंगल फौंडशनतर्फे होणारा ४२ वा सामुदायिक विवाह सोहळा आहे. आतापर्यंत ३ हजार ८९ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यामध्ये हिंदू २ हजार ३८२, बौद्ध ६७६, मुस्लिम २०, जैन ७ तर ख्रिश्चन समाजाचे ७ विवाह झाले आहेत.