चिमुकल्यांनी तयार केली ८०० रोपे

लॉकडाऊनचा असाही सदुपयोग

चिमुकल्यांनी तयार केली ८०० रोपे

सोलापूर : प्रतिनिधी

लॉकडाऊनचा सदुपयोग करत तीन चिमुकल्यांनी मिळून चक्क ८०० रोपे तयार करून जोपासली आहेत. या लहानग्यांनी केलेला हा उपक्रम मोठ्यांसाठीही आदर्शवत ठरला आहे.

आर्यन अश्विनकुमार भोपळे (इ. ९ वी, केएलई स्कुल), अर्जुन अश्विनकुमार भोपळे (इ. ५ वी केएलई स्कुल) आणि विरेन प्रविण भोपळे (इ. २ री आयएमएस ) या तीन विद्यार्थ्यांनी हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे.

मागीलवर्षीपासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या. शाळा बंद झाल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस झाल्यानंतर वेळ घालविण्यासाठी काय करावे असा प्रश्न विद्यार्थ्यांच्यासमोर होता. यावर उत्तर शोधत रोपे तयार करण्याची योजना या चिमुकल्यांनी बनविली. घरात आणलेल्या फळे, भाज्यांच्या बिया काढून त्या वाळवून त्यापासून रोपे बनविण्याची मोहीम आखली गेली आणि त्यावर त्यांनी कामही सुरू केले. आंबा, आवळा, जांभूळ, पेरू, चिकू, चिंच, लिंबू, सीताफळ अशा अनेक प्रकारच्या फळांच्या बिया साठवून त्या मातीत पेरण्यात आल्या.

सुरुवातीला क्लिष्ट वाटणारे काम हळूहळू पेरलेल्या बियांतून अंकुर फुटू लागल्यावर मात्र आनंददायी वाटू लागले. आपण टाकलेल्या बियांतून रोपे उगवत असल्याचे पाहून या चिमुकल्यांचा उत्साह दुणावला.

अखेर पेरू, चिकू, आंबा, कडुनिंब, चिंच, पिंपळ, आवळा,  तुळस, जांभूळ, जास्वंद, उंबर, रामफळ अशी तब्बल ८०० रोपे तयार झाली.

आता या रोपांची जोपासना कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मुलांच्या या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी पालक अश्विनकुमार भोपळे, प्रविण भोपळे यांनी पुढाकार घेतला. रोपांची जोपासना करण्यासाठी काळ्या पिशव्या त्यांनी आणून दिल्या. पावसाने वाहून आलेली माती गोळा करून ती पिशव्यांत भरण्यात आली. त्यात ही रोपे लावून त्यांना जगविण्याची योजना आखण्यात आली. त्यानुसार ही ८०० झाडे जोपासण्यासाठी आर्यन, अर्जुन आणि विरेन यांनी नियमितपणे पाणी घालणे, खत म्हणून स्वयंपाक घरातील पाणी, भाज्यांचे देठ, अंड्याची टरफले टाकणे असे प्रयोग केले. यामुळे रोपांची छान वाढ झाली आहे.

मागीलवर्षी छंदातून सुरू झालेल्या या उपक्रमाने आता विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे स्वरूप घेतले आहे. ही झाडे आता होटगी, कुमठे येथील शेतात लावण्यात येणार असल्याचे आर्यन, अश्विन आणि विरेन यांनी सांगितले.
--------------
पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत
विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनमध्ये असे उपक्रम राबविल्यास त्यांचे मनोरंजन होण्याबरोबरच पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्याचा आनंदही त्यांना मिळणार आहे.
--- अश्विनकुमार भोपळे, पालक