गौरी आवाहनबाबत दाते पंचांगकडून महत्वाची माहिती
काय म्हणाले ओंकार दाते ? वाचा !
सोलापूर : प्रतिनिधी
३ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन दिवसभर आहे. गौरी आवाहनाकरिता वैधृति योग आणि भद्राकाल वर्ज्य नाही, असे पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी सांगितले.
भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राचे दिवशी गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. काही प्रांतात सप्तमीचे दिवशी आवाहन, अष्टमीला गौरी पूजन करून नवमीला विसर्जन केले जाते.
शाडूचे किंवा पितळी असे देवीचे दोन मुखवटे उभे करून किंवा सुगड / तांब्यावर ठेवून पूजन केले जाते. काही जणांकडे ५ खडे वाटीत ठेवून पूजन केले जाते. यामध्ये श्रावण मासातील शुक्रवारी काही जणांकडे महालक्ष्मी स्थापना केली जाते. ती लक्ष्मी व भाद्रपदात अनुराधा नक्षत्रावर आणलेली गौरी अशा ज्येष्ठा / कनिष्ठा म्हणून दोन देवींची पूजा केली जाते. तसेच काही जणांकडे भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा / कनिष्ठा लक्ष्मी भगिनींची पूजा केली जाते. ती नंतर १६ दिवस करावयाची असते आणि रोज १ दोरा पूजेत घ्यावयाचा असतो. मात्र सध्याच्या काळात ज्येष्ठा नक्षत्रावर १६ दिवसांचे प्रतीक म्हणून १६ गाठी मारलेला तातू पूजेत घेऊन नंतर तो दुसरे दिवशी हातात बांधतात.
या देवीची पूजा, कुलधर्म, कुलाचार पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता दिसून येते. अनेकांकडे गौरीपुढे नैवेद्य दाखवून ता दिवसभर ठेवून दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे. पण ताट तसेच ठेवून दुसरे दिवशी प्रसाद घेणे योग्य वाटत नाही. कारण कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो. गौरी विसर्जनाची मर्यादा काही वेळेस सकाळी लवकर असते. अशा वेळेस मंत्रांनी जागेवर गौरीविसर्जन करून घ्यावे आणि नंतर संध्याकाळी प्रथेप्रमाणे आवरून ठेवावे किंवा जलाशयात विसर्जन करावे.
दिनांक ३ सप्टेंबर रोजी शनिवारी अनुराधा नक्षत्रावर दिवसभरात कधीही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्याह्नी असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने दिनांक ४ सप्टेंबर रोजी रविवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने दिनांक ५ सप्टेंबर रोजी सोमवारी रात्री ०८:०६ पर्यंत गौरी विसर्जन करता येईल, असेही ओंकार दाते यांनी सांगितले.
दाते पंचांगाच्या ऑनलाईन सेवांकरिता web.datepanchang.com