सोलापुरात तब्बल ५०० एकर जागेत होणार भव्य वन उद्यान

वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सोलापुरात घोषणा : नागरिकांनी सूचना देण्याचे आवाहन

सोलापुरात तब्बल ५०० एकर जागेत होणार भव्य वन उद्यान

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरात शहरातील वनविभागाच्या तब्बल ५०० एकर जागेवर भव्य वन उद्यान तयार करण्यासाठी मान्यता दिल्याची माहिती राज्याचे वन व सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली.

कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने कर्नाटकात जाण्यासाठी श्री. मुनगुंटीवार बुधवारी सोलापूर शहरात आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख यांनी ही मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने या उद्यानास मान्यता दिली असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. सोलापूर शहरात शुद्ध हवा देणारे केंद्र व्हावे याकरिता वन उद्यानाबाबत उद्या (गुरुवारी) बैठक होणार आहे. या वन उद्यानाबाबतच्या सूचना नागरिकांनी आ. सुभाष देशमुख यांच्या कार्यालयात किंवा वन खात्याच्या कार्यालयात आणून द्याव्यात. त्यांची योग्य दखल घेतली जाईल असे श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, पुणे विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.
-----------
श्री सदस्यांच्या मृत्यूचे राजकारण दुर्दैवी

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेला श्री सदस्यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु सत्तेची भूक असलेल्या विरोधकांकडून श्री सदस्यांच्या मृत्यूचे राजकारण केले जात आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा भव्य दिव्य झाल्याने काही जणांना त्रास होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी देखील उन्हातच बसलेल्या होत्या. सत्तेची लालसा असणाऱ्या काही जणांनी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या खोट्या सहीचे खोटे पत्र चांद्यापासून बांद्यापर्यंत व्हायरल केले. याचा सूत्रधार शोधून काढण्याची विनंती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे. रात्रीचा प्रवास करणे श्री सदस्यांसाठी अवघड असल्याने दिवसा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
----------------
मराठा आरक्षणाबाबत शासन सकारात्मक

मराठा समाजाला आरक्षण मिळणे बाबत शासन सकारात्मक आणि गंभीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा आरक्षणाची मागणी झाली नाही. गेल्या अडीच वर्षात देखील मराठा मोर्चे झाले नाहीत. कारण मराठा समाजाचा भाजपा आणि शिवसेनेच्या सरकारच्या कार्य कुशलतेवर विश्वास आहे. भाजप शिवसेनेचे सरकार हे काम सकारात्मकपणे करेल असा विश्वास मराठा समाजाला आहे. त्यामुळे मराठा समाज आरक्षणाची हक्काने मागणी करत आहे, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
------------
पंढरपुरातील संकीर्तन सभागृहासाठी २० कोटी रुपयांचा मिळणार पहिला हप्ता

पंढरपूर हे आध्यात्मिक ऊर्जा देणारे शहर आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पंढरपुरात संकीर्तन सभागृहासाठी ६५ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने हे काम थांबवले. तसेच निधी देखील उपलब्ध करून दिला नाही. आता या संकीर्तन सभागृहासाठी ४० कोटी रुपयांची मान्यता देऊन यातील २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.