रे नगर चा बिगर सिंचन पाणी वापराचा झाला करार

रे नगरच्या लाभार्थ्यांना मिळणार २४ तास पाणी : माजी आमदार नरसय्या आडम

रे नगर चा बिगर सिंचन पाणी वापराचा झाला करार

सोलापूर : प्रतिनिधी

रे नगरचा बिगर सिंचन पाणी वापराचा करार महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे मंगळवारी झाला. या करारान्वये लाभार्थ्यांना २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे.

याबाबत माजी आमदार नरसय्या आडम म्हणाले, कुंभारी येथे सोलापूर शहरातील ३० हजार असंघटीत कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पथदर्शी रे नगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा नियोजित १२ जानेवारी रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ व स्वस्त पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी हे अत्यंत अत्यावश्यक आहे. याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे आज मंगळवारी बिगर सिंचन पाणी वापर करार झाला. 

या करारामुळे रे नगर वसाहतीला दररोज २४ एमएलडी पाणी एनटीपीसीकडून मिळणार आहे. या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून १६ एमएलडी पाणी एनटीपीसी ला परत पुरवठा करावयाचे आहे. हा करार अभूतपूर्व व ऐतिहासिक करार असून या करारान्वये लाभार्थ्यांना २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे. याकरिता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून शासनानेही याची दखल घेऊन लाभार्थ्यांकारिता सहकार्याची भूमिका निभावलेली आहे.

मंगळवारी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता धीरज साळे व रे नगर फेडरेशन यांचा सिंचन भवन सोलापूर येथे लाभार्थ्यांना पिण्यासाठी व वापरासाठी मुबलक पाणी वितरणाचा अधिकृत करार झाला. यावेळी रे नगर फेडरेशनचे मुख्यप्रवर्तक, माजी आमदार नरसय्या आडम, चेअरमन नलिनी कलबुर्गी व सेक्रेटरी युसुफ शेख यांनी कराराच्या दस्तावेजावर स्वाक्षरी केल्या. कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी साक्षांकित केले. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत कुंभारी येथे ३० हजार असंघटीत कामगारांचा महत्वाकांक्षी पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारले असून त्याचे पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरे नियोजित १२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे. या आधी रे नगर येथे मुलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असून त्या अनुषंगाने रे नगरच्या लाभार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व स्वस्त दरात पाणी तसेच दैनंदिन गरजेच्या वापरासाठी पाणी मिळवून देण्याकरिता बिगर सिंचन पाणी वापर कराराचा प्रस्तावास २९ एप्रिल २०२२ रोजी शासनाने मंजुरी दिली. त्या अनुषंगाने शासनाकडे उपलब्ध जलाशयाचा साठा व रे नगरला लागणारे पाणी याचे ताळमेळ बसवून शासनाकडे माहिती देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे नियम व अटी अन्वये करार करण्यात आला. 
सदर प्रस्तावाच्या नियम क्र. २४ प्रमाणे रे नगर वसाहतीसाठी उजनी जलाशय ते एनटीपीसी प्रकल्प स्थळापर्यंत पाणी आणण्याकरिता एनटीपीसी च्या अस्तित्वातील पंप व पाईप लाईनचा वापर करणे प्रस्तावित आहे. तसेच रे नगर करिता घेण्यात येणाऱ्या पाण्याची परिमाण हे एनटीपीसीने उचलेल्या उजनी जलाशयातील मंजूर औद्योगिक पाण्याच्या परिमाणातून वजा करून उर्वरित परिमाण एनटीपीसीच्या देयक अंतर्भूत करण्यासहि सहमती दर्शविली आहे. त्याप्रमाणे रे नगर व जलसंपदा विभाग यांच्यात करार झाला. 

यावेळी उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी आज रोजी रे नगर सोबत बिगर सिंचन पाणी वापर अधिकृत करार झाले असून त्यास विभागाच्या वतीने साक्षांकित करण्यात आल्याची माहिती दिली. 

वास्तविक पाहता केंद्र व राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्या समवेत सदर कराराच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठका पार पडल्या. महाराष्ट्र शासनाने रे नगरला पाण्यासाठी २७ कोटी ५० लाख रुपये शुल्क भरण्याचे आदेश दिले होते. परंतु सदर लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व श्रमिक कष्टकरी असल्यामुळे त्यांच्याकडून सदरचे शुल्क अदा करणे अशक्यप्राय होते. याकरिता रे नगरचे मुख्यप्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वस्तुस्थिती मांडली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सदरचे शुल्क माफ केले. या निर्णयामुळे श्रमिकांना दिलासा मिळाला. उजनी धरणाला नगरपालिकेप्रमाणे दरवर्षी पाणी शुल्क भरावे लागणार आहे. साधारणतः लाभार्थ्यांना दर महिन्याला नाममात्र अर्थातच २०० ते २२५ रुपये पाणी शुल्क भरावे लागणार आहे. लवकरच या वसाहतीत सौरऊर्जा प्रकल्प अस्तित्वात येणार असून त्याचाही लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. 

सोलापूर शहरात आजमितीस ५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. हि गैरसोय टाळण्यासाठी शहरातून रे नगर येथे वास्तव्यास येणाऱ्या तसेच गोदुताई नगर व लगत परिसरातील नागरिकांना बिगर सिंचन पाणी वापर करारामुळे भविष्यात दिवसाआड वा २४ तास पाणी पुरवठा होणार आहे. ही अत्यंत आनंदाची व ऐतिहासिक बाब असल्याचे श्री. आडम यांनी सांगितले.

हा करार झाल्यानंतर सिंचन भवन येथे रे नगर फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, लाभार्थी व कार्यकर्ते यांनी सिंचन भवनच्या बाहेर फटाके उडवून, मिठाई वाटून जल्लोष केला. 

याप्रसंगी माजी नगरसेविका कामिनी आडम, शाखा अभियंता योगेश मोरे, वसंत विहार प्रा. लि. चे मेहुल मुळे, संदीप झाकणे, कुर्मय्या म्हेत्रे, गजेंद्र दंडी, ॲड.अनिल वासम, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, वीरेंद पद्मा, नरेश दुगाणे, बाळकृष्ण मल्याळ, शाम आडम आदींची उपस्थिती होती.