मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा अचानक रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा अचानक रद्द

सोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा अचानक रद्द झाला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असून आज दिवसभरात होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक तसेच इतर कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. परिणामी, होम मैदान येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली.

महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापुरात येणार होते. होम मैदान येथे हा कार्यक्रम ठरला होता. मात्र मंगळवारी दुपारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.

सोलापुरातील कार्यक्रमासह सायंकाळी ०४.३० वाजता मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात नियोजित केलेली राज्य मंत्रिमंडळ बैठक, महात्मा फुले नविनीकरण ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) संचालक मंडळाची बैठक, तसेच सायंकाळी ०७.३० वाजता मालदीव प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझु व शिष्टमंडळ यांच्या समवेत मुंबई येथील राजभवनमध्ये आयोजित द्विपक्षीय बैठक व त्यांच्या स्वागतार्थ आयोजित स्नेहभोजन समारंभ, रात्री ०८.३० वाजता नियोजित कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी सांगितले.