मनोज जरांगे - पाटील ' या ' दिवशी घेणार मोठा निर्णय
गोळ्या घातल्या तरी ओबीसीतूनच आरक्षण घेण्याचा निर्धार : शांतता रॅलीला प्रचंड जनसमुदाय
सोलापूर : प्रतिनिधी
सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षण विरोधी उमेदवार पाडायचे की मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे याबाबतचा निर्णय २९ ऑगस्ट रोजी आंतरवली सराटी येथे होणाऱ्या बैठकीत करूया. काहीजण माझ्या विरोधात कट रचत आहेत. मला गोळ्या जरी घातल्या तरी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देणार आहे, असा पुनरुच्चार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी बुधवारी सोलापुरात केला.
मनोज जरांगे - पाटील यांच्या शांतता रॅलीला बुधवारी सोलापुरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. अक्षरशः हजारो मराठा समाजबांधव सर्व रस्त्यांवर उत्साहात बसून मनोज जरांगे - पाटील यांचे भाषण ऐकत होते. श्री. पाटील यांनी अत्यंत उत्साही आणि आवेशपूर्ण शैलीत मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले. भर पावसातही मराठा समाज बांधवांनी जागेवरून न उठता मनोज जरांगे - पाटील यांना प्रतिसाद दिला.
छत्रपती श्री संभाजी महाराज चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, तेथून मेकॅनिकी चौक, सरस्वती चौक, भैय्या चौक, बाळीवेस, सम्राट चौक ही सर्व रस्ते मराठा समाज बांधवांच्या प्रचंड गर्दीने फुलून गेले होते.
शांतता रॅलीसाठी मराठा समाज बांधव सकाळी ९ वाजल्यापासूनच छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात एकत्र येत होते. हाती भगवे झेंडे, छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा, मनोज जरांगे - पाटीलयांची प्रतिमा, गळ्यात भगवे उपरणे परिधान करून अबालवृद्ध मराठा बांधव जय भवानी जय शिवराय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत चौकात दाखल होत होते.
सर्वत्र भगवे झेंडे लावल्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाज सेवा मंडळ, सकल मराठा समाज पंढरपूर आदी संस्था, संघटनांकडून रॅलीसाठी येणाऱ्या समाज बांधवांसाठी नाश्ता, जेवण, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वितरणाची सोय करण्यात आली होती.
----------
मनोज जरांगे - पाटील म्हणाले,
* पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा असा भेद नको. सर्व मराठे एकच
* ज्यांना मराठा समाजाने मोठे केले तेच आता त्रास देत आहेत.
* मराठा समाजाचा स्वाभिमान गहाण पडता कामा नये.
* माझ्या बदनामीचा कट रचला जात आहे.
* मराठा नेत्यांनी पक्षापेक्षा जातीला अधिक महत्त्व द्यावे.
* जो नेता छगन भुजबळ यांना ज्या मतदारसंघात घेऊन फिरेल त्या नेत्याला आणि त्या मतदारसंघातील उमेदवाराला पाडा.
* मराठ्यांच्या नादाला लागल की काय होते ते दाखवून देणार.
*आंतरवली सराटी येथे झालेल्या लाठीमारानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची बाजू घेतल्यामुळे आम्ही फडणवीस यांच्यावर टीका करत आहोत.
* काहीजण मतांसाठी पावसात भिजतात आम्ही जातीसाठी भिजतो.
* गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचे ऐकून संभ्रमित होऊ नका.
*राजकारण्यांनी मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याच्या आड येऊ नये.
* *मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार. काही काळ प्रतीक्षा करा.
*गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळे चोर गोळा केले.
* मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या. मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल.
*माझा मालक कोणीही नाही. माझा मालक मराठा समाजच.
* मराठा समाजाचा उमेदवार दिला तर १००% मतदान त्याच उमेदवाराला करा.
* बोगस मतदार बाहेर काढा.
* कोणाच्याही प्रचाराला सभेला जाऊ नका.
* सरकारने कुणबी प्रमाणपत्रला मुदतवाढ द्यावी.
* २९ ऑगस्ट रोजी सर्वांनी अंतरवली सराटी येथे यावे.