"भाजपात चालते 'स्क्रिप्टेड' लोकशाही"

भाजपवर टीका करत प्रा. अशोक निंबर्गी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

"भाजपात चालते 'स्क्रिप्टेड' लोकशाही"

सोलापूर : प्रतिनिधी

'भारतीय जनता पार्टीत हुकुमशाही पद्धतीने आदेश दिला जातो आणि लोकशाही पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जाते. अशी 'स्क्रिप्टेड' लोकशाही भाजपामध्ये चालते', अशी टीका करत भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी रविवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या काँग्रेसच्या निर्धार महामेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेसचा झेंडा देऊन त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, ज्येष्ठ नेते भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान, ज्येष्ठ नेत्या उज्वला शिंदे, आ. प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश यलगुलवार आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. अशोक निंबर्गी यांनी भाजपातील कार्यपद्धतीवर टीका केली. प्रा. निंबर्गी म्हणाले, दोन दिवसांपासून माझी घालमेल सुरू होती. मी झोपडपट्टीतील कार्यकर्ता होतो. लालकृष्ण अडवाणी यांच्या विचारांना घेऊन निघालो होतो. परंतु गेल्या ७ वर्षांपासून भाजपात हा विचार कुठे आहे ? याचा शोध घेत होतो. असंख्य कार्यकर्त्यांची भाजपात घुसमट होत आहे. शहर - जिल्ह्याच्या राजकारणात या घुसमटीला तोंड कोण फोडणार, याचे उत्तर मिळत नव्हते. भाजपातील एकाधिकारशाहीला विरोध करण्याचा मी निर्धार केला आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून मी काँग्रेस पक्षात कार्यरत राहणार आहे, असे प्रा. निंबर्गी यांनी जाहीर केले.

सोलापूरकरांनी दररोज पुरेसे पाणी, पथदिवे, चांगली रुग्णालये, क्रीडांगणे, उद्याने, महापालिकेच्या चांगल्या शाळा मागितल्या होत्या. मात्र पक्षातील अनेकांचे खच्चीकरण झाले. 'एकाची आडवा आणि दुसऱ्याची जिरवा' असे धोरण भाजपात सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर असतानाच भाजपाचे माजी शहराध्यक्ष काँग्रेसमध्ये गेल्याने सोलापूरच्या राजकारणावर याचा कसा परिणाम होतो, हे आगामी काळच ठरवणार आहे.
----------------
काँग्रेसच्या माजी महापौरांची मागितली माफी

गेल्या पाच वर्षांत सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. त्यापूर्वी पाच वर्षे मी नगरसेवक होतो. त्यावेळी कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याची शिकवण आम्हाला दिली गेली. माजी महापौर अलका राठोड आणि माजी महापौर प्रा. सुशीला आबुटे यांना सर्वाधिक त्रास दिलेला नगरसेवक मी आहे. आज मी त्यांची जाहीर माफी मागतो, असे प्रा. निंबर्गी यावेळी म्हणाले. त्यांच्या या विधानाने उपस्थितांपैकी अनेकांच्या भुवया उंचावल्या.