तंबाखूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक
संदीप कोहिणकर : तंबाखूपासून दूर राहण्याचा सल्ला
सोलापूर : प्रतिनिधी
भारतात इतर देशांच्या मानाने तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. तंबाखूच्या सेवनाचे अनेक दुष्परिणाम असून, तंबाखू सेवन अनेक रोगांना निमंत्रण देते. त्यामुळे तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहून आरोग्य सांभाळावे, असे आवाहन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व मानसिक आरोग्य कार्यक्रम तसेच जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आयोजित दंत व मानसिक आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते. जिल्हा परिषद प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, जिल्हा मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. रोहन वायचळ, जिल्हा लेखा अधिकारी श्रीमती वैशाली थोरात, तंबाखू नियंत्रण कक्षाचे समुपेशक श्रीमती मंजूश्री मुळे, सामाजिक कार्यकर्ते अमित महाडिक, नितीन निकंबे, श्री. राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी उपस्थितांना जिल्हा परिषद परिसर, जिल्हा परिषदेच्या सर्व उपक्रमांमध्ये स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. तसेच तंबाखूचे सेवन करून कुठेही थुंकू नये, असे सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनीही तंबाखू सेवनाविरोधात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून आयोजित निबंध, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच उपस्थितांना जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शपथ देण्यात आली. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय येथील तपासणी वाहनाचे उद्घाटन श्री. कोहिणकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोनिका हिरेमठ, सच्चिदानंद बांगर, शशिकांत ढेकळे, स्वाती गायकवाड यांनी परिश्रम घेतले.