उमेदवारी जाहीर होताच शहर उत्तर भाजपमध्ये उडाला भडका

' हीच ती वेळ गद्दाराला धडा शिकविण्याची' पोस्ट व्हायरल : गद्दार कोण ? याची नागरिकांमध्ये चर्चा

उमेदवारी जाहीर होताच शहर उत्तर भाजपमध्ये उडाला भडका

पुरूषोत्तम कारकल 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या पहिल्या यादीतील नावे जाहीर होताच शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये मोठा भडका उडाला आहे. पुन्हा तोच उमेदवार कार्यकर्त्यांवर लादल्याचा राग कार्यकर्ते आता उघड व्यक्त करू लागले आहेत. दरम्यान, 'हीच ती वेळ गद्दाराला धडा शिकवण्याची' अशी पोस्ट शहर उत्तर विधानसभा भाजप कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या सोशल मीडिया हँडल्सवर सर्वत्र व्हायरल होत आहे.

विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विषयी भाजपमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजपातील विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांकडे केली होती. परंतु वरिष्ठांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांच्या मताला न जुमानता पुन्हा विजयकुमार देशमुख यांनाच शहर उत्तर विधानसभेची उमेदवारी देऊ केली आहे.

यावर संतप्त झालेल्या भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयकुमार देशमुख यांच्या विषयीची नाराजी 'महाबातमी न्यूज पोर्टल' कडे नाव न लिहण्याच्या अटीवर व्यक्त केली.

भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून व्हायरल केली जाणारी ती पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे :

 हीच ती वेळ
अपमानाचा बदला घेण्याची संधी आली आहे........

१) बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रस्थापितांसोबत जाऊन भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांचा केलेला पराभव आम्ही विसरलो नाही....

२) १९९९ विधानसभा निवडणुकीत देशपांडे साहेबांशी केलेली गद्दारी आम्ही विसरलो नाही.

३) २०२४ लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांना पाडण्यासाठी केलेली गद्दारी आम्ही विसरलो नाही.

४) मी आणि माझा मुलगा म्हणजे पक्ष म्हणून नव्या कार्यकर्त्यांना दिलेला त्रास आम्ही विसरणार नाही.

५) साखर पेठ भागातील वक्फ बोर्डाचा विषय सभागृहात एकदाही मांडला नाही हे आम्ही विसरणार नाही.

६) कार्यकर्त्यांमध्ये लावा लावी करणे, घराघरात भांडण लावून आपली राजकीय पोळी भाजून घेणे आम्ही विसरलो नाही.

८) २०१४ विधानसभा निवडणुकीत मोहिनी पत्की मॅडम यांना पाडण्यासाठी तुम्ही केलेले षडयंत्र आम्ही विसरलो नाही.

अशा तिखट शब्दात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात उघडपणे बंड पुकारले आहे.

आता या बंडाचा सामना उमेदवार विजयकुमार देशमुख आणि भाजपातील वरिष्ठ मंडळी कसा करणार  ?, या बंडाचा फायदा विरोधकांना होणार का ?, याचा परिणाम म्हणून भाजपचा शहर उत्तर विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तर त्याचा फटका राज्यातील महायुतीला बसणार का ? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. त्यामुळे शहरातील इतर दोन विधानसभांपेक्षा शहर उत्तर विधानसभा निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.