श्री सदस्यांच्या मृत्यूच्या अश्रूंचे राजकारण नको

आ. प्रणिती शिंदे यांना शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांचा सल्ला

श्री सदस्यांच्या मृत्यूच्या अश्रूंचे राजकारण नको

सोलापूर : प्रतिनिधी

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात ११ जणांचा झालेला दुर्दैवी मृत्यू सर्वांनाच यातना देणारा आहे. परंतु श्री सदस्यांच्या मृत्यूच्या अश्रूंचे राजकारण करण्याची ही वेळ नाही. त्यापेक्षा त्या कुटुंबीयांचे अश्रू पुसणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी आ. प्रणिती शिंदे यांना दिला.

खारघर येथील झालेल्या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आ. प्रणिती शिंदे यांनी सोमवारी केली होती. यावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. वाघमारे यांनी आ. शिंदे यांचे आरोप फेटाळून लावले.

प्रा. वाघमारे म्हणाल्या, २००९ - १० दरम्यान सोलापूर शहरात दूषित पाण्यामुळे तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी या घटनेची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर ढकलून कोण बाजूला झाले ? कोरोना काळात ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूची जबाबदारी कोणाची ? कोविड हॉस्पिटलला लागलेल्या आगीत जळून मृत पावलेल्या नागरिकांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची ? असे प्रश्नही प्रा. वाघमारे यांनी यावेळी उपस्थित केले.

श्री सदस्यांच्या मृत्यूचे राजकारण करण्याऐवजी यातील जे दोन श्री सदस्य सोलापूर जिल्ह्यातील होते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केलीत का ? त्यांना मदत केलीत का ? असा प्रश्नही प्रा. वाघमारे यांनी शिंदे यांना विचारला.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी प्रशासनाद्वारे आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती. अडीच लाख ओआरएस पाकीटे, पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र पाईप लाईन, ५५ मेडिकल बूथ, १०० रुग्णवाहिका आदी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु निसर्गाचा कोप झाल्याने ही दुःखद घटना घडली आहे. त्यांच्या दुःखात शासन त्यांच्यासोबत आहे. यातील अनेकांनी घटनेपूर्वी सात ते आठ तासांपासून उपवास केल्याचे शवविच्छेदन अहवालात लक्षात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना मदत केली आहे, असेही प्रा. वाघमारे यावेळी म्हणाल्या.

एका न्यूज पोर्टलच्या दाव्यानुसार कोरोना काळात १ लाख ४७ हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद शासन दरबारी आहे. तर चक्क १ लाख ८३ हजार नुकसान भरपाईचे दावे मंजूर करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही प्रा. वाघमारे यांनी सांगितले.
-----------
स्वा. सावरकरांवरील आरोप मान्य नाही

आ. प्रणिती शिंदे यांनी सावरकरांवर सोमवारी टीका केली होती. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता प्रा. वाघमारे म्हणाल्या, आ. प्रणिती शिंदे यांनी केलेला आरोप आम्हाला मान्य नाही. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंचा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील हा आरोप उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का ? असा टोलाही प्रा. वाघमारे यांनी महाविकास आघाडीला लगावला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पाठिंबा दिला होता, याकडेही प्रा. ज्योती वाघमारे यांनी लक्ष वेधले.