दक्षिण सोलापूर निवडणुकीच्या वादात आता धर्मराज काडादींची उडी

कोण काय म्हणाले.....

दक्षिण सोलापूर निवडणुकीच्या वादात आता धर्मराज काडादींची उडी

सोलापूर : प्रतिनिधी

मी तिकिटासाठी मागे लागणे मला योग्य वाटत नाही. सर्वांच्या आग्रहामुळे मी निवडणुकीच्या तयारीला लागलो. नेते जो निर्णय घेतील तो मान्य आहे अशी भूमिका धर्मराज काडादी यांनी शनिवारी त्यांच्या श्री काळजापूर मारुती मंदिरासमोरील गंगा निवास येथे जाहीर केली.

दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे अधिकृत उमेदवार कोण ? यावरून रणकंदन माजलेले असताना या निवडणुकीतील आणखी एक प्रमुख दावेदार धर्मराज काडादी यांनी या वादात आता उडी घेतली आहे.

शुक्रवारी दुपारी माजी आमदार दिलीप माने समर्थकांनी एकत्र येत श्री. माने यांच्या सुमित्रा बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन करून त्यांनी निवडणूक लढवावीच यासाठी आग्रह धरला. यानंतर शनिवारी सकाळी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उमेदवार अमर पाटील यांनी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच असून महाविकास आघाडीतील नेत्यांनी मला सहकार्य करावे असे आवाहन पत्रकार परिषद घेऊन केले.

यानंतर चारच तासांनी धर्मराज काडादी यांच्या समर्थकांनीही मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी एकत्र जमत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी धर्मराज काडादी समर्थकांची सहविचार सभा झाली.

"धर्मराज काडादी आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, कोण म्हणतंय देत नाही ? घेतल्याशिवाय राहत नाही" अशा घोषणा समर्थकांडून देण्यात येत होत्या.

यावेळी धर्मराज काडादी म्हणाले, सगळ्यांच्याच भावनेशी मी सहमत असेनच असे नाही पण कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्या. गेल्या १० वर्षात मला खूप त्रास झाला. माझ्या घराची संरक्षक भित पाडली. चिमणीच्या कामामुळे त्यांना उत्तर देणे गरजेचे होते. चिमणीच्या प्रकरणात शरद पवारांनी मदत केली. मी पूर्वी इच्छुक नव्हतो. पवार यांच्या आग्रहामुळे राष्ट्रवादीचा अर्ज भरला. परंतु महविकास आघाडीकडून कोणत्याही पक्षाकडून निवडणुक लढविण्यास तयार आहे. वरिष्ठांनी निर्णय घ्यावा.

यावेळी राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, शरणराज कडादी, बाळासाहेब शेळके, प्रा. अशोक निंबर्गी, अक्कलकोट पंचायत समितीचे माजी सभापती संजीव पाटील, हरिष पाटील, प्रा. भोजराज पवार, गुरुसिद्ध म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष भारत जाधव, सुभाष मुनाळे, शिवानंद कोनापुरे, चिदानंद वनारोटे, भीमाशंकर जमादार, सिद्धाराम चाकोते आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभेवर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. दक्षिण सोलापूर विधानसभेतील मतदार निवडणुकीत कोणाच्या बाजूने  उभे राहतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
-------

ॲड. मिलिंद थोबडे, श्रीशैल बनशेट्टी यांच्या एन्ट्रीने उपस्थित झाले चकित

सहविचार सभा सुरु असतानाच ॲड. मिलिंद थोबडे आणि श्रीशैल बनशेट्टी हे सभास्थळी आले. त्यांना पाहताच उपस्थित समर्थक चकित झाले. दोनच दिवसांपूर्वी माजी महापौर शोभा बनशेट्टी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मानाचा श्री आजोबा गणपतीचे दर्शन घेताना त्यांच्यासोबत असलेल्या ॲड. मिलिंद थोबडे आणि पती श्रीशैल बनशेट्टी
यांनी शनिवारी काडादी यांना समर्थन देण्यासाठी हजेरी लावली. 
---------------

कोण काय म्हणाले,

गुरुसिद्ध म्हेत्रे -
लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. महविकास आघाडीकडून शिंदे यांनी उमेदवारी न दिल्यास त्याचे परिणाम गंभीर होतील. लढणारच आहोत. विजयी होणार.
---------
प्रा. भोजराज पवार -

दक्षिण सोलापूरची जागा काँग्रेसला सुटली आहे हे निश्चित. विधानसभा निवडणुकीसाठी मीदेखील उमेदवारी मागितली होती. पण धर्मराज काडादी यांनी निवडणुक लढविल्यास आम्ही पाठिंबा देणार. तिकिटासाठी अनेकजण दबावतंत्र वापरत आहेत. काडादी समर्थकांनी दबावतंत्र वापरल्यास उमेदवारी मिळेलच.
---------
सुरेश हसापुरे - 
आम्हाला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही काम करत होतो. पण महाविकास आघाडीकडून शिवसेनेला जागा सुटली आहे. काय झाले ? कोणी केले ? माहिती नाही. (ज्यात काडादी यांचे नाव होते ती) पहिली यादी खरी होती. परत काय झाले ते सांगू शकत नाही. जर शिवसेनेने जागा सोडली तर सगळ्यांनी कामाला लागावे. इतकेच सांगतो, दोन दिवस थांबा आणि पहा. 
---------
बाळासाहेब शेळके -

बहुसंख्यांकांच्या मतांना विचारात घेतले नाही तर पराभव अटळ. कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे हे पाहिले. खा. प्रणिती शिंदेच्या विजयात एकट्याचे श्रेय नाही. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचा तो परिणाम आहे. धर्मराज काडादी यांना हलक्यात घेतले तर परिणाम भोगावे लागतील.
----------
चेतन नरोटे -
आपण काम केले आहे हे मान्य. पण आपला मतदारसंघ परत मिळविण्याचे आव्हान. आपली भावना वरिष्ठांना कळवतो. तिकीट कोणालाही मिळो, आमदार काँग्रेसचा होणे आवश्यक आहे. शिवसेनेचा बी फॉर्म आलेला असला तरी आमचाही बी फॉर्म भरू. अर्ज काढून घ्यायला वेळ आहे. आपण भांडलो तर भाजप निवडून येईल.
----------
राजशेखर शिवदारे -
आम्हाला कोणावर राग व्यक्त करायचा नाही. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि खा. प्रणिती शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. उमेदवारी धर्मराज काडादी यांनाच आणि महाविकास आघाडीकडूनच मिळणे आवश्यक आहे.